मोबाईलमध्ये आपण तासन्तास गुंतून बसतो परंतु आपल्या बाजूला असलेल्या आपल्या आईची-वडिलांशी, पत्नीशी, भावाशी आपल्या मुलांशी बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. रेल्वेतून प्रवास करताना अथवा बसमधून प्रवास करताना जर आपण प्रवाशाकडे पाहिलात तर ते आपल्या बाजूला बसलेल्या प्रवाशांच्या सुख-दुःखाशी त्यांना आता देणे घेणे नाही तर ते आपल्या मोबाईलमध्ये काही तरी बघण्यात आणि शोधण्यात व्यस्त दिसत असतात; परंतु आता गावाकडच्या एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी हद्दपार होतानाही दिसून येत आहात. खरे तर ही परिस्थिती योग्य वेळीच सावरली नाही तर सामाजिक परिणाम अत्यंत गंभीर असतील हेही तितकेच खरे.
आधुनिक तंत्रज्ञानाने अचाट अशी प्रगती केली आहे. याच प्रगतीमुळे माणूस समाज आणि कुटुंबापासून दुरावत चालल्याचे विदारक चित्र अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येते. भौतिक सुखाच्या मागे धावता-धावता माणूस एकाकी जीवनाकडे कधी वळला हे कळलेसुद्धा नाही, अशी परिस्थिती आपण पाहतो. संगणक आणि मोबाईल या वस्तू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. आपण मोबाईलच्या इतक्या अधीन गेलो आहोत की आपणही एक यंत्र झालोत की काय अशी भीती वाटावी इतकी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाच कुटुंबात राहणार्या अनेक सदस्यांचा दिवस-दिवस संवाद होत नाही. आपण एकमेकांशी बोलण्यापेक्षा आपापल्या मोबाईलमध्ये जास्त व्यस्त राहण्याचा प्रयत्न करतो. केवळ मोबाईलमुळेच आपण एकाकी जीवन जगतो आहोत असे नाही; परंतु एकाकी जीवन जगण्यासाठी मोबाईलही तितकाच कारणीभूत आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मोबाईलमुळे जग जवळ आले; परंतु जवळची माणसं जगावेगळी झाली ही परिस्थिती मात्र विदारक आहे. अलीकडच्या काळात माणूस स्वतःला अलिप्त ठेवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना आपण पाहतो. आपल्याच कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा, काका- काकू, मामा-मामी, वहिनी-ताई कुटुंबातील या कोणत्याही सदस्यांशी आपल्याला बोलण्यासाठी आता वेळ मिळत नसल्याचे दिसून येते. एखादा अपवाद सोडले तर बहुतांश मंडळी एकाकी जीवन जगत आहेत. ही परिस्थिती का निर्माण झाली? याला कारणीभूत कोण आहेत? हे शोधणे गरजेचे आहे.
एखाद्या साध्या गोष्टीवरून आपण आपल्या नात्यातील व्यक्तींसोबत, मित्रासोबत बोलणे बंद करतो. ते इतके बंद करतो की आपल्याला कधीतरी तो आपल्या रक्तातला, आपल्या जिव्हाळ्यातला माणूस होता याचाही विसर पडतो आणि मग नात्यात मोठा दुरावा निर्माण होतो. हा दुरावा अस्वस्थ वाटणारा जरी असला तरी तो कालांतराने अंगवळणी पडतो आणि मग रक्ताची नाती दुरावली की एखादा समाजातील कुठलातरी व्यक्ती आपल्याला जवळचा होतो. तीच माणसे आपल्याला जवळची वाटायला लागतात. बर्याचदा एकाच कुटुंबात असणारी माणसे एकमेकांचा हेवादावे करतानाही अबोला धरतात आणि मग संवाद दुरावतो. संवाद दुरावला की एकत्र कुटुंब विभक्त होतात आणि मग नवरा, बायको त्यांची दोन मुले या पलीकडे त्यांचे जग नसते. एखाद्या मॉलमध्ये जाणे असेल, एखाद्या हॉटेलमध्ये खाणे असेल, कुठलातरी चित्रपट पाहणे असेल किंवा एखाद्या पर्यटन स्थळ जाणे असेल तर ती ही चार लोकच किंवा त्याहीपेक्षा कमी सदस्य असणारे कुटुंब पाहताना किंवा फिरताना दिसतात. एकत्र कुटुंब म्हणजे त्या कुटुंबातील अन्य सदस्य मात्र त्यांच्यासोबत नसतात, कारण आम्हाला एकाकी राहण्याची सवय लागलेली आहे. यामुळे घरात संस्कार कमी झाले आहेत. आपल्या घरातील मुलांना अन्य सदस्यांची भीती उरली नाही. नात्यातला आदर उरला नाही. स्नेह, आपुलकी, जिव्हाळा आटत चालला आहे. त्यामुळे ही मुले स्वैर वागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोबाईलमध्ये आपण तासन्तास गुंतून बसतो परंतु आपल्या बाजूला असलेल्या आपल्या आईची-वडिलांशी, पत्नीशी, भावाशी आपल्या मुलांशी बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. रेल्वेतून प्रवास करताना अथवा बसमधून प्रवास करताना जर आपण प्रवाशाकडे पाहिलात तर ते आपल्या बाजूला बसलेल्या प्रवाशांच्या सुख-दुःखाशी त्यांना आता देणे घेणे नाही तर ते आपल्या मोबाईलमध्ये काही तरी बघण्यात आणि शोधण्यात व्यस्त दिसत असतात; परंतु आता गावाकडच्या एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी हद्दपार होतानाही दिसून येत आहात. खरे तर ही परिस्थिती योग्य वेळीच सावरली नाही तर सामाजिक परिणाम अत्यंत गंभीर असतील हेही तितकेच खरे. संवाद केवळ नात्यापुरताच नाही तर संवाद समाजाशी असावा. समाज-राष्ट्राशी असावा. संवाद समाज हितासाठी असावा, कारण संवादातून मने जुळतात. माणसे जुळतात. समाज जुळतो आणि नवराष्ट्र निर्माण होते. म्हणून आधुनिक सुख सोयी किती आल्या तरी बोलणे बंद करू नका, कारण एकमेकांशी बोलणे सुरू असेल तर जग सुरू राहील. जग सुरू असेल तरच तुम्ही आम्ही जगू. अन्यथा मोबाईल एका कोपर्यात जसा आपण वापरून फेकून देतो तशी आपली नाती आपल्याला फेकून देतील. तेव्हा आपण एका कोपर्यात एक वस्तू म्हणून कायम राहू का? ही परिस्थिती कोणावर येऊ नये. यासाठी चला आजपासून आपापल्या नात्यातील प्रत्येकाशी संवाद साधूया. तुटलेली नाती आणि मन पुन्हा जोडूया. एकमेकांच्या सुखदुःखात पुन्हा सहभागी होऊया आणि पुन्हा एकदा आनंदी समज निर्माण करूया, कारण नाते कोणतेही असो त्यात संवाद असावाच लागतो. संवाद नसेल तर रक्तवाहिन्या नसलेल्या शरीरागत आपले कुटुंब आणि आपले जीवन आहे असे समजावे लागेल.
राम तरटे
८६००८५२१८३