शेतकरी पुन्हा निसर्गजन्य संकटाच्या विळख्यात
विपुल परिहार
उसर्रा (Paddy Mawa-Tudtuda) : मोहाडी तालुक्यातील शेतकर्यांवर पुन्हा एकदा निसर्गजन्य संकट कोसळले आहे. धानपिकांवर मावा व तुडतुड्या या संसर्गजन्य कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. या कीटकांमुळे धानपीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टी, नियमित जोरदार पाऊस व पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतातील धान पीक जमीनदोस्त झाले असून काही शेतकर्यांचे धानपिके सडून आसमानी संकटामुळे शेतकर्यांची पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यातच (Paddy Mawa-Tudtuda) शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर आता नुकत्याच आलेल्या या नव्या नैसर्गिक संसर्गजन्य कीटकांच्या संकटामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. पुन्हा एकदा शेतकर्याला सावकाराच्या दारी उभे राहून हात पसरवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, जर शेतकर्यांनी तातडीने (Paddy Mawa-Tudtuda) कीड नियंत्रणासाठी फवारणीसह योग्य उपाययोजना केली नाही, तर आगामी हंगामात धान उत्पादन कोसळणार असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी शासनाने नैसर्गिक संकटाच्या विळख्यात सापडलेल्या या शेतकर्यांच्या धानपिकाचे तात्काळ पंचनामे करून प्रतिहेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करावी अशी मागणी शेतकर्यांकडून जोर धरू लागली आहे.