जिल्हाभरात काँग्रेसमध्ये नवचैतन्य; मावळते अध्यक्ष झाले प्रदेश सरचिटणीस!
लातूर (Abhay Salunkhe) : काँग्रेस नेतृत्वाची थोर परंपरा असलेल्या लातूरमध्ये जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी तरुण आणि तडफदार कार्यकर्ते अभय साळुंखे यांची निवड काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी केली आहे. पक्षाचे महासचिव वेणुगोपाल यांनी राज्यातील जिल्हाध्यक्षांची नावे पक्षाच्यावतीने जाहीर केले असून, त्यामध्ये अभय साळुंखे यांची लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी (Latur Rural District President) निवड झाल्याचे स्पष्ट केले आहे. या घोषणेमुळे लातूर जिल्ह्यात काँग्रेस जनांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
पक्षाच्या सरचिटणीस पदाची संधी!
लातूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी अत्यंत चांगली कामगिरी करणारे औसा येथील सुपुत्र श्रीशैल उटगे यांनी या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद गेली काही महिने रिक्त होते. तथापि, श्रीशैल उटगे यांच्या कार्याचा सन्मान करीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उटगे यांना पक्षाच्या सरचिटणीस पदाची (Secretary General Post) संधी दिली आहे. औसा विधानसभा मतदारसंघातून ही संधी मिळाल्याने या मतदारसंघातील आजपर्यंत त्यांनी केलेल्या कार्याला पक्षाने पोचपावती दिल्याचे मानले जात आहे.
निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसच्या सभा आपल्या वक्तव्याने गाजविल्या!
काँग्रेसचे तरुण तडफदार नेते अभय साळुंखे यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. अत्यंत थोडक्या मतांनी त्यांची विधानसभेची संधी गेली. निलंगा मतदार संघात काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी विधानसभेची लढाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लढविली होती. यामुळे काँग्रेसच्या (Congress) पारड्यात ऐतिहासिक मते या मतदारसंघात मिळाली. अभय साळुंखे यांचे कार्य लातूर जिल्ह्यात सर्वदूर आहे. अनेक वेगवेगळ्या आंदोलनात त्यांनी उतरून सर्वसामान्य जनता, शेतकरी, बेरोजगार, महिला, विद्यार्थी अशा विविध घटकांसाठी न्याय मिळविण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना या पक्षातून त्यांनी काँग्रेसमध्ये माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला, तेव्हापासून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यात ते हिरिरीने अग्रस्थानी दिसून आले. यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसच्या सभा आपल्या वक्तव्याने गाजविल्या आहेत.
काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील संघटन अधिक मजबूत आणि सक्षम होईल!
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अभय साळुंके (Abhay Salunke) यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या आगामी कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा. लातूर जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, येथे पक्ष नेतृत्वाची थोर परंपरा आहे, त्या परंपरेला अनुसरून त्यांच्या माध्यमातून कार्य घडेल ही अपेक्षा आहे. श्री अभय साळुंखे, उत्तम संघटक, प्रभावी वक्ते आणि परिश्रम करणारे पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात ते काँग्रेस पक्षाचे धोरण, भूमिका आणि विचार जिल्ह्यातील घराघरापर्यंत घेऊन जातील, यातून काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील संघटन (Organization) अधिक मजबूत आणि सक्षम होईल हा विश्वास आहे.
– माजी मंत्री आ. अमित देशमुख