सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल...!
परभणी : शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसविण्यात आलेल्या शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्याची वायर विनापरवाना तोडण्यात आली. सदर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा प्रकार ७ ऑगस्ट रोजी दुपारी छत्रपती शिवाजी चौक परिसरात घडला. याप्रकरणी व्यापार्याविरुध्द नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेर्यांची सायबर पोलिस पथकाकडून तपासणी सुरू असताना छत्रपती शिवाजी चौक येथील न्यू ब्रॉन बेबी किडस वेअर या दुकानासमोरील कॅमेर्याची वायर तोडलेली आढळून आली.
या प्रकरणी सायबर पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस शिपाई किशोर भिंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यापारी शेख जावेद शेख नबी याच्याविरुध्द नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ७ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेर्याची वायर तोडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार इरशाद करीत आहेत.
कडक कारवाई करणार - पोनि. गजेंद्र सरोदे
परभणी शहरामध्ये शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्याचे वायर तोडण्याचा प्रकार समोर आला आहे. शासकीय कॅमेरे हे जनतेच्या सेवेसाठी आहेत. तेंव्हा याची काळजी घेणे नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु काहीजण शासकीय कॅमेर्याचे वायर तोडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून असा प्रकार इतर कोणी केल्यास यापेक्षाही कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी दिली.