जुनी सांगवीतील घटना; गंभीर जखमी महिलेला औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू
पिंपरी-चिंचवडच्या जुनी सांगवी परिसरात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेल्या डीजेच्या रॅकला अचानक अपघात झाला. रॅक कोसळून त्यातील डीजे ४५ वर्षीय महिलेच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऐन उत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सध्या तणावाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथे दहीहंडीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. याच तयारीदरम्यान डीजेचा रॅक उभारण्याचे काम सुरू असताना तो अचानक कोसळला. रॅकमधील डीजे थेट महिलेच्या अंगावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी केलेल्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या दुर्घटनेनंतर दहीहंडीच्या आयोजनासाठी संबंधित आयोजकांनी वाहतूक विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची आवश्यक परवानगी घेतली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या प्रकरणात दहीहंडीचे आयोजक आणि डीजे मालकाविरोधात पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
सध्या पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.