१० किमी खोलीवर भूकंपाचे केंद्र; अहेरी-नागेपल्लीतही जाणवली कंपने, जीवित-वित्तहानी नाही
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाची खोली जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सिरोंचा तालुक्यासह अहेरी तालुक्यातील अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही या भूकंपाची सौम्य कंपने जाणवली. पहाटेच्या वेळी अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

भूकंपाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील विविध भागांतून संभाव्य नुकसानीची माहिती घेतली जात असून, प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
दरम्यान, भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. तसेच सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अफवा आणि अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी भूकंपासंदर्भातील माहितीसाठी केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे :
- ३ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३६ वाजता भूकंपाची नोंद
- भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर
- खोली सुमारे १० किलोमीटर
- केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात
- अहेरी व नागेपल्लीतही सौम्य धक्के जाणवले
- प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही