गोधणीतील फागुजी लेआउटमध्ये मध्यरात्री घडली घटना; NDRF, पोलीस, अग्निशमन आणि आरोग्य पथकांकडून मदतकार्य
नागपूरच्या गोधणी परिसरात मध्यरात्री क्लोरीन गॅसची गळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. फागुजी लेआउट येथील गोधणी ग्रामपंचायतीच्या पाणी प्रक्रिया केंद्रातून गॅस बाहेर पसरल्याची घटना रविवारी रात्री घडली. गॅसच्या संपर्कामुळे श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि अस्वस्थतेचा त्रास झाल्याने किमान 52 नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधितांची अंतिम संख्या निश्चित करण्याचे काम अद्याप सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 12 ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान परिसरातील नागरिकांना अचानक तीव्र क्लोरीनचा वास जाणवू लागला. काही वेळातच गॅसचा प्रभाव आजूबाजूच्या भागात जाणवू लागला आणि नागरिकांना श्वसनाचा त्रास तसेच डोळ्यांत जळजळ होऊ लागली. परिस्थिती लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पाणी प्रक्रिया केंद्राच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या.
Nagpur, Maharashtra: A chlorine gas leak at the Godhani Nagar Panchayat water purification plant in Nagpur left around 40 people with breathing difficulties. Eight to 10 plant employees and 20 to 25 local residents were hospitalized, with four to five admitted to the ICU. Fire… pic.twitter.com/XAEZX4F4Wu
— IANS (@ians_india) August 24, 2026
200 मीटरचा परिसर रिकामा करून सील
गळतीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पाणी प्रक्रिया केंद्राभोवती सुमारे 200 मीटरचा परिसर रिकामा करून सील केला. या भागातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले. गॅसचा अधिक प्रसार होऊ नये आणि नागरिकांना त्याचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी काम सुरू केले.
दरम्यान, NDRFचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस, अग्निशमन विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारीही मदतकार्यात सहभागी झाले. आपत्कालीन पथकांच्या उपस्थितीत बाधित क्षेत्रात प्रवेश मर्यादित करण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
OCWच्या पथकाकडून गळती नियंत्रणासाठी मदत
क्लोरीन गॅसची गळती रोखण्याच्या कार्यवाहीत OCWच्या पथकानेही महत्त्वाची भूमिका बजावली. पथकातील नितीन आणि किशोर यांनी Self-Contained Breathing Apparatus अर्थात SCBA सेट परिधान करून धोकादायक वातावरणात बचाव व नियंत्रणाच्या कामात सहभाग घेतला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि Directorate of Industrial Safety and Health (DISH) पथकांकडून OCWच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीचे कौतुक करण्यात आले.
सकाळपर्यंत परिसरात क्लोरीनचा तीव्र वास
रात्रीच्या आपत्कालीन कारवाईनंतरही सकाळच्या वेळी पाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसरात क्लोरीनचा तीव्र वास जाणवत असल्याचे समोर आले. गॅसचा प्रभाव प्रामुख्याने प्रक्रिया केंद्राच्या आसपासच्या भागात जाणवत होता. तर बाधित क्षेत्रापासून दूर असलेल्या नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरू असल्याचे दिसून आले.
फागुजी लेआउटमधील परिस्थितीची पाहणी केली असता परिसर अद्याप सील असल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलीस आणि NDRFचे जवान तैनात होते.
दोन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू; कारण अद्याप स्पष्ट नाही
घटनेच्या परिसरात दोन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. परिसरातील दृश्यांमध्ये मृत कुत्रे दिसत असून, या घटनेशी संबंधित काही व्हिडीओही ऑनलाइन प्रसारित झाले आहेत. मात्र, या दोन्ही कुत्र्यांचा मृत्यू क्लोरीनच्या संपर्कामुळेच झाला असल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्वतंत्र तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
पाणी प्रक्रिया केंद्र गोधणी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित
या घटनेतील पाणी प्रक्रिया केंद्र नागपूर महापालिकेचे (NMC) नसून गोधणी ग्रामपंचायतीकडून चालवले जाते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, क्लोरीन गॅसची गळती नेमकी कशामुळे झाली, त्यामागील कारण काय आणि या घटनेत एकूण किती नागरिक बाधित झाले, याचा प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे. सील करण्यात आलेल्या परिसरापासून नागरिकांनी दूर राहावे आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.