नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार
नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत आज, १९ सप्टेंबर रोजी, मोठी भर पडत आहे. इंदोरा चौक ते दिघोरी चौक या मार्गावरील सुमारे ८.९ किलोमीटर लांबीचा बहुप्रतिक्षित उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होत आहे. सुमारे ९९८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे उत्तर आणि दक्षिण नागपूरदरम्यानची वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
रेशीमबाग चौक येथे आज सायंकाळी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) NH-353D वर उभारण्यात आला आहे.
नागपुर शहर की उत्तर से दक्षिण दिशा को जोड़ने वाले 998 करोड़ रुपये की लागत से निर्मित कमान चौक से दिघोरी तक के महत्वपूर्ण उड्डाणपुल का लोकार्पण समारोह कल शाम 5 बजे रेशीमबाग चौक में आयोजित किया गया है। यह परियोजना शहर के प्रमुख मार्गों की कनेक्टिविटी और यातायात व्यवस्था को बेहतर… pic.twitter.com/8duWvfn6pc
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 18, 2026
८.९ किलोमीटरचा उन्नत मार्ग
इंदोरा चौक, अशोक चौक, शीतला माता चौक आणि दिघोरी चौक यांना जोडणाऱ्या या कॉरिडॉरची एकूण लांबी ८.९० किलोमीटर आहे. त्यातील ६.३७ किलोमीटरचा भाग उड्डाणपूल असून, संपूर्ण प्रकल्पात १३.८२ किलोमीटरच्या सर्व्हिस आणि स्लिप रोडचाही समावेश आहे. उड्डाणपुलाची रुंदी १२ मीटर असून तो दोन लेनचा, दोन्ही दिशेने वाहतूक करणारा मार्ग आहे.
या प्रकल्पात अत्याधुनिक Ultra High Performance Fibre Reinforced Concrete (UHPFRC) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भांडे प्लॉट चौक ते दिघोरीदरम्यानचा जवळपास तीन किलोमीटरचा भाग UHPFRC गर्डर्सवर उभारण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विशेष ठरतो.
अशोक चौकातील उंचावलेली रोटरी ठरणार आकर्षण
अशोक चौकात उड्डाणपुलाचा महत्त्वाचा भाग म्हणून उंचावलेली रोटरी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध दिशांना जाणाऱ्या मार्गांना जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या इंटरचेंजमुळे नंदनवन, बसस्थानक तसेच शासकीय रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला सुविधा मिळणार आहे.
प्रकल्पात पाचपावली येथील जुन्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या जागी नवीन ROB उभारण्यात आला आहे. डागा मेमोरियल महिला रुग्णालयाजवळ चढ-उताराचे रॅम्प देण्यात आले असून, ताजबाग परिसरातही रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे.
३ प्रमुख आणि ११ लहान चौकांवरील ताण कमी होणार
उड्डाणपुलामुळे शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या तीन प्रमुख आणि ११ लहान चौकांवरील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी रस्त्यांच्या पायाभूत सुविधांवरही काम करण्यात आले आहे. उड्डाणपुलाखालील मुख्य रस्त्याचा विकास केल्याने स्थानिक वाहतूकही अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
दाट लोकवस्तीमुळे बांधकाम ठरले आव्हानात्मक
जुन्या आणि दाट लोकवस्तीच्या भागातून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे इमारतींच्या जवळून अवजड यंत्रसामग्री नेणे, अरुंद रस्त्यांमध्ये बांधकाम करणे आणि बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत ठेवणे अशी अनेक आव्हाने निर्माण झाली. या कामामुळे स्थानिक नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला आणि प्रकल्पाच्या पूर्णत्वासही विलंब झाला.
या प्रकल्पाचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष लोकार्पण सप्टेंबरमध्ये होत आहे. आता उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नागपूरच्या पूर्व भागातील कोंडी कमी होण्यास आणि उत्तर-दक्षिण जोडणी अधिक सुलभ होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
पुलाला डॉ. हेडगेवार यांचे नाव
महाल परिसरातून जाताना हा उड्डाणपूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या घराजवळून जातो. त्यामुळे या उड्डाणपुलाला “डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपूल” असे नाव देण्यात आले आहे. या नामकरणावरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत.