Marathi Language Week 2026

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Marathi Language Week 2026

‘अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026’चे उद्घाटन; डिजिटल प्लॅटफॉर्म, OTT आणि सोशल मीडियावर मराठी कंटेंट वाढवण्यावर भर

मुंबई : मराठी भाषेचा वारसा जपत तिला भविष्यातील ज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा बनवण्यासाठी डिजिटल क्षेत्रात तिचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’निमित्त आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026’च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठीला हजारो वर्षांचा भाषिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून तिच्या समृद्ध परंपरेला राजमान्यताही मिळणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. महाराष्ट्र शासनाने विविध ऐतिहासिक आणि भाषिक पुरावे केंद्र सरकारसमोर सातत्याने मांडत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मंजुरी दिली. हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्ञानेश्वरीपासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत मराठीचा प्रवास

शाहीर, लोककलावंत आणि भक्तीपरंपरेने मराठी भाषेला समृद्ध केले. संत ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ आणि संत तुकारामांचे अभंग यामुळे मराठीचे महत्त्व अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचले, असे फडणवीस यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासोबत स्वभाषेच्या महत्त्वालाही अधोरेखित केले. राज्यकारभार मराठीमध्ये व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले तसेच मराठी राजभाषा कोशाच्या निर्मितीचे कामही केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महात्मा फुले, आगरकर, गोखले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचे विचार समाजापर्यंत पोहोचवले. त्यामुळे मराठीमध्ये केवळ संवाद नाही, तर विचार, ज्ञान, संघर्ष, परिवर्तन, अभिमान आणि स्वाभिमानाची परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी भाषेचे स्वरूपही विविध भावभावनांनी नटलेले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नाजूकपणा, रागटपणा, गोंधळशी वृत्ती, मायाळूपणा, प्रखरता आणि तेज यांसोबतच तेज, ओज, करुणा, शील, चारित्र्य, पराक्रम आणि क्षमाशीलता या गुणांचाही मराठीमध्ये समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचे महत्त्वाचे स्थान असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी शब्दसंपत्ती वाढवण्यावर भर

मराठी ज्ञानकोश आणि शब्दकोशांमध्ये सुमारे 11 लाख ते 13 लाख शब्द आढळत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. त्याचवेळी ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सुमारे 6 लाख शब्द असल्याचे त्यांनी सांगितले. मंडारिन, स्पॅनिश आणि फ्रेंच या भाषांमध्ये साधारण 3 ते साडेतीन लाख शब्द असल्याचा संदर्भही त्यांनी दिला.

महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या मराठी शब्दकोशात सध्या सुमारे 3 लाख शब्दांचा समावेश झाला आहे. भविष्यात ही शब्दसंपदा 13 लाख शब्दांपर्यंत नेण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

भाषा ही केवळ माणसांमधील संवादाचे साधन नसून संस्कृती, इतिहास, परंपरा आणि ज्ञानाची वाहक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखादी भाषा लोप पावल्यास तिच्यासोबत त्या भाषेशी संबंधित संस्कृती, विचार, सभ्यता आणि व्यवस्थेचाही ऱ्हास होण्याचा धोका असतो. अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचा इतिहास, प्रथा आणि परंपरा समजून घेण्यासाठी भाषेची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाषा जिवंत ठेवण्यासाठी तीन घटक आवश्यक

भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी भाषेचा वापर, भाषेचा वावर आणि भाषेचे संशोधन या तीन बाबींवर सातत्याने काम करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या तिन्ही क्षेत्रांमध्ये सातत्य राहण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे जगभरातील मराठी भाषिकांपर्यंत ही भाषा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलांच्या विकासासाठी मातृभाषेचा आग्रह

विकासाच्या प्रक्रियेत मातृभाषेला विशेष महत्त्व असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. मुलांच्या आयुष्यातील पहिल्या पाच वर्षांत मेंदूचा मोठ्या प्रमाणावर विकास होतो. त्यामुळे या काळात पालकांनी मुलांशी अधिकाधिक संवाद मातृभाषेत साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

मातृभाषेतील संवादामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत होते आणि त्यानंतर इतर भाषा शिकण्यासही त्याचा फायदा होतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाषा हा केवळ भावनिक किंवा स्वाभिमानाचा विषय नसून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित महत्त्वाचा घटक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

AI, क्वांटम कॉम्प्युटिंगमध्येही मराठीचा वापर हवा

डिजिटल माध्यमांमुळे संवादाची पद्धत बदलली असून या बदलत्या युगात ‘डिजिटल मराठी’ विकसित करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठी भाषा विभागाने डिजिटल माध्यमांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यादृष्टीने काम सुरू केले आहे.

AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात मराठीचा महत्त्वपूर्ण सहभाग असणे आवश्यक आहे. भविष्यात AI, Quantum Computing, Space Technology आणि Biotechnology यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी आवश्यक व्यवस्था विकसित करावी लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

मराठीला ज्ञानाची भाषा बनवायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तिचा वापर वाढवणे आवश्यक आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात मराठी कंटेंट उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. मराठीतील डिजिटल सामग्री वाढल्यास नव्या पिढीशी भाषेचे नाते अधिक मजबूत होईल, असे त्यांनी नमूद केले.

स्पीच-टू-टेक्स्टसारख्या तंत्रज्ञानामुळे मराठीसमोर नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. मराठीतील अभिजात साहित्य केवळ मराठी भाषिकांपुरते मर्यादित न ठेवता इतर भाषिकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

OTT आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मराठी कंटेंट वाढवण्याच्या दिशेने मराठी भाषा विभाग काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्या डिजिटल संस्कृतीमध्ये मराठी भाषा प्रभावीपणे टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

बोलीभाषा हेही मराठीचे मोठे वैभव

मराठीची समृद्धी केवळ प्रमाण मराठीपुरती मर्यादित नसून तिच्या विविध बोलीभाषांमध्येही असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. कोकणी, वऱ्हाडी, मालवणी, रायगडी, आगरी, धनगरी आणि झाडमुळी यांसारख्या बोलींचे वैविध्य जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या बोलीभाषांमध्ये निर्माण होणारे साहित्य, आयोजित होणारी साहित्य संमेलने आणि साहित्यिकांच्या विविध कल्पना हे मराठी भाषेच्या वैभवाचा महत्त्वाचा भाग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

देशात एखाद्या एका भाषेत सर्वाधिक साहित्य संमेलने होत असतील, तर ती भाषा मराठी असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी नाट्यसंस्कृती आणि कलावंतांनी देशातील नाट्यपरंपरा जिवंत ठेवण्यात मोठे योगदान दिले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत नसतानाही मराठी नाटकांमधून प्रेक्षकांना मिळणारा अनुभव आणि नाट्यकर्मींचे कौशल्य उल्लेखनीय असल्याचे फडणवीस म्हणाले.

मराठी रंगभूमीची अभिजात आणि भक्कम परंपरा जपण्याबरोबरच साहित्य, कला आणि मराठी भाषेच्या विविध आविष्कारांचे संवर्धन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. विश्व मराठी संमेलनासह विविध मराठी साहित्यिक आणि सांस्कृतिक संमेलनांना राज्य शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठीचा विस्तार आणि संवर्धन करताना तिचे साहित्यिक, सांस्कृतिक, डिजिटल तसेच बोलीभाषिक वैविध्य जपणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026