नालासोपारा स्थानकाजवळील घटनेने खळबळ; मृताची ओळख पटवण्याचे आचोळे पोलिसांचे प्रयत्न, वाशिंदमध्येही महिलेचा लोकलमधून पडून मृत्यू
नालासोपारा : पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा येथे धावत्या लोकलमधून पडल्याची शक्यता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह कॅपिटल मॉल परिसरातील गटाराच्या नाल्यात आढळून आल्याने खळबळ उडाली. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास काही नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याची माहिती असून, प्राथमिक तपासात तो लोकलमधून पडल्याचे निष्पन्न झाल्याचे आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी सांगितले.
कॅपिटल मॉल परिसरातील नाल्यात मृतदेह पडल्याची माहिती मिळताच आचोळे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नाल्यात अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला आणि तो पोलिसांच्या ताब्यात दिला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नालासोपारा रेल्वे स्थानकातून लोकल सुटल्यानंतर संबंधित व्यक्ती धावत्या लोकलमधून खाली पडली असावी, असा अंदाज आहे. मात्र, तो नेमका कोणत्या लोकलमधून प्रवास करत होता, त्याचा प्रवास कुठून कुठे सुरू होता आणि तो लोकलमधून नेमका कसा पडला, याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेच्या सर्व शक्यता तपासून पुढील कार्यवाही केली जात आहे.
वाशिंदमध्येही लोकलमधून पडून २५ वर्षीय महिलेचा मृत्यू
मध्य रेल्वे मार्गावरील वाशिंद रेल्वे स्थानकाजवळही धावत्या लोकलमधून पडून एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये मोठी गर्दी होती. त्यामुळे महिला दरवाजाजवळ उभी असल्याची माहिती आहे.
लोकल धावत असताना महिलेचा तोल गेल्याने ती खाली पडली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.