१०८ रुग्णवाहिका दोन तास आली नसल्याचा आरोप; पाच जणांवर कोतवालीत गुन्हा
परभणी (Pregnant woman Death) : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील उपचार व रेफरल प्रक्रियेतील कथित हलगर्जीपणामुळे ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक, डॉक्टर व निवासी वैद्यकीय अधिकार्यासह पाच जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अमीन शेख अयुब (रा. साठे नगर, नेवाती मोहल्ला, जिंतूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीची पत्नी मरजीनाबी अमीन शेख (वय २२) ही सात महिन्याची गर्भवती होती. तिचा रक्तदाब कमी झाल्याने व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवार ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी तिला परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाची तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेसाठी सात वेळा संपर्क साधूनही सुमारे दोन तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. दरम्यान महिलेची प्रकृती अधिक गंभीर झाली.
नंतर संबंधित डॉक्टरांनी रुग्णाला रेफर करता येणार नसल्याचे सांगितल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक केशव यादव, मोहम्मद जलाल, डॉक्टर अभिजित इप्पर, डॉक्टर कुलदीप चोरमले तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्मा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) १०६(१) व २१२ या कलमा अन्वये गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत. दरम्यान, घटनेनंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात करण्याची मागणी केली.
त्यानुसार मृतदेह नांदेड येथे पाठविण्यात आला असून रविवारी ‘इन कॅमेरा’ पद्धतीने शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कारभारावरही गंभीर आरोप केले आहेत. (Pregnant woman Death) रुग्ण व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून वरिष्ठ अधिकार्यांना भेटण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. तसेच मयत महिलेचा मृतदेह कुठे ठेवण्यात आला होता, याबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.