ठिकठिकाणी पडलेले खड्डे जीवावर; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
कोरची : कोरची तालुक्यापासून 9 कि.मी. अंतरावर असलेल्या कोटरा, माहाका, हितापाडी, मिसपिरी ते मकेंकसा या 3 कि.मी. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच सोहले ते बोटेकसा या मार्गाची अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नसल्याने रस्ता खड्डेमय झाला असून अपघाताला आमंत्रण देत आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले असून रहदारी करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. परिणामी, सदर मार्ग रहदारीसाठी धोकादायक ठरत आहे. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच आमदार, खासदार या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यातील मकेंकसा ते कोटरा, माहाका, मिसपिरी हा रस्ता जीर्ण झाला असून सोहले ते बोटेकसा मार्गाचीही दुरवस्था झाली आहे.
पुलाला भगदाड; दखल घेणार कोण?
मकेंकसा ते कोटरा, कोटरा ते माहाका तसेच सोहले ते बोटेकसा या मुख्य मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी नाल्यावर पूल आहेत. पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होत असते. असे असले तरी मार्गावरील गावांना जोडण्यासाठी हे पूल महत्त्वाचे आहेत.
पावसाळ्यात पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. अशातच या पुलाचा भाग खचला असून पुलाच्या सलाखीही बाहेर आल्या आहेत. अपघाताची प्रतीक्षा असलेल्या संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात एखादी अप्रिय घटना घडल्यास विभागाचे अधिकारी जबाबदारी घेणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रतिक्रिया
“तात्काळ खराब झालेले पूल व रस्ते दुरुस्तीसाठी मंजूर करून खडीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तालुका अध्यक्ष सदाशिव गहाणे, कोरची यांनी दिला.