Babhulgaon :- ओल्या दुष्काळात सर्व काही गमावलेल्या शेतकर्यांचा (Farmers)आक्रोश किती तीव्र असू शकतो, याचे दाहक दर्शन २६ सप्टेंबर रोजी तालुक्यातील घारफळ येथे घडले. शासन व प्रशासनाच्या मदतीच्या घोषणा हवेत विरल्या असताना आणि शासन झोपेत असताना आज संतप्त गावकर्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांच्या पाहणी दौर्याचे डफडे वाजवून अनोखे उपरोधिक ‘स्वागत’ केले. हे स्वागत पारंपरिक नव्हते, तर शासनाच्या निष्क्रियतेवर व्यक्त झालेला रोष होता. घारफळ गावातील या अभूतपूर्व आंदोलनाने तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. धुर्यावर धान्य नसेल, तर शेतकरी रस्त्यावर उतरेल, आणि मग शासनाला थेट जबाब द्यावा लागेल. असा इशाराच शेतकर्यांनी दिला.
घारफळ येथील शेतकर्यांनी व्यक्त केला प्रशासनावर संताप
जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे व तालुका कृषी अधिकारी (Agricultural Officer) कृतिका डेरे, कृषी पर्यवेक्षक गोपाल जाधव, सहायक दत्ता चेंडके आधी कर्मचारी घारफळ शिवारातील शेती व पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे उपस्थित शेतकरी, गावकर्यांनी ढोल-ताशांचा प्रचंड गजर करीत अधिकार्यांचे निषेध व्यक्त करणारे स्वागत केले. परंतु हा गजर आनंद व्यक्त करण्यासाठी नाही, तर दुःखाचा, क्रोधाचा आणि उपाशी पोटी असलेल्या असहायतेचा आवाज सरकारच्या कानावर पोहोचवण्यासाठी होता. शेतकर्यांनी अधिकारी मंडळींना चिखलातून पायवाट काढत थेट शेतीच्या खरडलेल्या धुर्यावर नेण्यात आले. त्या शेतात धान्याचा एक कणही उरला नव्हता. शेतशिवारातील ओसाडपणा दाखवणारे दृश्य शासनाला दिलेला एक संदेश होता. यावेळी अधिकारी मंडळी अक्षरशः मौन होवून शेतकर्यांचा संताप ऐकत राहिली. यावेळी सतीश कावळे, राजू चिंचे, भानुदास राऊत, नरेश पुनसे, दिलीप चांडक, निखील कडू, युवराज नाखले, अजय रंदळकर, अनंता थोटे, गजानन कदम, वीरेंद्र डांगे, सुधाकर ठाकरे आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.