Pusad rain :- गेल्या पंधरा-वीस दिवसापासून दडी मारून बसलेल्या मान्सूनच्या (monsoon) पावसाने जोरदार हजेरी लावत मेघर्जनेसह पुसद तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे नदी, नाले तुडुंब वाहिले तर अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी साचले यामुळे तालुक्यात एक हजार ३७ आर हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. तर शहरातील काही व्यवसायिकांच्या दुकानांच्या भिंतीही कोसळल्या.
शहरातील काही व्यवसायिकांच्या दुकानांच्या भिंतीही कोसळल्या
तर काही नागरिकांच्या घरांची पडझड झाली. यावर्षीचा पहिला पूर पूस नदीला गेला तर छोट्या पुलाच्या वरून पुराचे पाणी वाहत होते. नदीकाठच्या रहिवाशांना तहसील प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या होत्या. तर पुसद तहसील कार्यालयातील आपत्कालीन विभागाचे लिपिक सुरोशे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुसळधार पावसामुळे आठ नागरिकांच्या घरांची पडझड झाली. सुदैवाने या पावसामुळे कुठेही जीवित हानी झाल्याची घटना घडली नाही. शेतकर्यांच्या पिकांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा तर होतीच मात्र यंदा म्हणावा तसा अजूनही मान्सूनचा पाऊस कोसळला नसल्यामुळे तालुक्यातील पूस धरण( वसंत सागर ) अजूनही भरले नाही. पूस धरण एकदा भरले की, शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटते, तर शेती करिता सिंचनासाठी या धरणाचे पाणीही शेतकर्यांना उपलब्ध करून दिल्या जाते.
या धरणामध्ये ५९ पाणीसाठा उपलब्ध असून मात्र त्यामध्ये धरणातील (Dam) गाळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मुळात पाणीसाठा नेमका किती? पाऊस चांगला कोसळल्यामुळे शेतकर्यांच्या शेतकामांना वेग आला आहे तर नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतीचे पंचनामे प्रशासनाने तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने प्रशासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी तालुक्यातील बळीराजाकडून करण्यात येत आहे.