देव तारी त्याला कोण मारी!
राष्ट्रीय महामार्गावरील घटना!
खानापूर चित्ता (Car Accident) : हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता पासून जवळ असलेल्या माळ धामणी फाट्यावर कारच्या दोन-तीन पलट्या झाल्या तरी चालक सुखरूप वाहनाच्या बाहेर निघाला.’ देव तारी त्याला कोण मारी ‘ असा प्रत्येक 11 ऑक्टोंबर रोजी सकाळीच पहावयास मिळाला.
रस्ता दुरुस्तीचे काम मागील अनेक दिवसापासून सुरू!
हिंगोली-माळ धामणी फाटा या राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक 161 रस्ता दुरुस्ती चे काम (Road Work) मागील अनेक दिवसापासून सुरू आहे. रस्त्यावर काम करीत असताना मशीन व कामगारांना सुरक्षा म्हणून रस्त्यावर जागोजागी बॅरिकेट्स उभारण्यात आलेले आहेत. या बॅरिकेट्समुळे वाहन चालकांना समोर एखादे जनावर आहे का? असे लक्षात येत नाही. असाच प्रकार 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडला. वाशिम वरून बाळापुर कडे जाणारे चार चाकी वाहन ( कार) क्रमांक एम एच 05 डी ई 1032 समोर अचानक नीलगाय आल्याने ती नीलगाय रोडवर ठेवण्यात आलेल्या बॅरिकेट्स मुळे चालकास दिसली नसल्याने चालकाने आपले वाहन रोडवरील डिव्हायडर ला धडकून कार पलटी होऊन जवळपास दोन ते तीन पलट्या घेतल्या. यावेळी सदरील वाहनात फक्त चालक असल्याने चालकास कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. यावेळी सेलसुरा येथील भगवान उर्फ बंटी घुगे हे सकाळी हिंगोली कडे जात असताना सदरील अपघात दिसताच बंटी घुगे यांनी चालकास पलटी झालेल्या वाहनाच्या बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. चालकास कोणतीही गंभीर दुखापत नसल्याची माहिती ही बंटी घुगे यांनी देशोन्नतीला दिली. यामुळे नशीब जर बलवत्तर असेल तर कोणीही मारू शकत नाही असा प्रत्यय पलटी झालेल्या वाहनातील चालकातून दिसून आला. देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.
गुत्तेदाराच्या आळशी कामगारांना हे करणे जमत नसल्याने अपघाताची मालिका सुरू!
एकंदरीत राष्ट्रीय महामार्गावर दिवसा काम सुरू असताना बॅरिकेट्स लावणं जरुरी आहे. परंतु रात्रीच्या वेळी हेच बॅरिकेट्स रस्त्याच्या बाजूस उचलून ठेवले तर पुढील अपघात होऊन अनर्थ नक्कीच टळला जाईल हे मात्र निश्चित आहे. परंतु आळशी गुत्तेदाराच्या आळशी कामगारांना हे करणे जमत नसल्याने अपघाताची मालिका सुरू होत असल्याचे सदरील अपघातावरून दिसून येत आहे.