परभणी (Parbhani) :- परभणी पोलिसांच्या वतीने राबविण्यात आलेल्या कोम्बींग ऑपरेशन (Combing operation) मध्ये फरार असलेल्या नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. जिल्ह्यात १९ ठिकाणी नाकाबंदी करुन तपासणी (Inspection) करण्यात आली.
परभणीत १९ ठिकाणी नाकाबंदी; हॉटेल, लॉज, वाहनांची तपासणी
परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसात गुन्हेगारी घटना, घरफोडी, चोरी यामध्ये वाढ झाली आहे. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांना तपासणे, फरार असलेल्या गुन्हेगारांचा शोध, संशयितांना ताब्यात घेण्या करीता कोम्बींग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यामध्ये १९ ठिकाणी नाकाबंदी करत कोम्बींग राबविण्यात आले. १०३ हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊसची (Guest House) तपासणी करण्यात आली. त्याच बरोबर २४६ वाहने तपासण्यात आली. ४२ गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. कौम्बींग मध्ये फरारी असलेले नऊ आरोपी पकडण्यात आले. ६८ जणांना वारंट बजावण्यात आले. तसेच तडीपार असलेले आठ जण तपासण्यात आले. या कोम्बींग ऑपरेशनमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ३० अधिकारी, ९९ अंमलदारांनी सहभाग घेतला.