आमदरी येथील घटना, सरपंचाची ठाण्यात तक्रार!
मानोरा (Crime Case) : पोलीस स्टेशन मानोरा (Police Station Manora) अंतर्गत येणाऱ्या मौजे आमदरी येथे स्वातंत्र्यदिनी दि. 15 ऑगस्ट रोजी गावातील गावठाण जागेवर जनावरांना पाण्याची सोय व्हावी, म्हणून जेसीबी मशीनने हौद तयार करण्यासाठी खड्डा करीत असताना आमच्या घरात पाणी जाते म्हणून खड्डा कराल, तर जीवाने मराल अशी दोघांनी धमकी दिल्याप्रकरणी सरपंच गोविंद चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गैरअर्जदार सुभाष नंदुसिंग चव्हाण व त्यांचा मुलगा विशाल सुभाष चव्हाण यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.
धक्का बुक्की करून जीवाने मारण्याची धमकी!
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार गावातील गुरे ढोरे यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून गावातील गावठाण जागेवर हौद बांधकाम करण्याकरिता स्वातंत्र्यदिनी शनिवारला जेसीबी मशीनने खड्डा तयार करीत असताना सरपंच (Sarpanch) गोविंद चव्हाण, सदस्य दशरथ सखाराम राठोड व ग्राम पंचायतचे (Gram Panchayat) कर्मचारी बलजीत पुंडलिक राठोड घटनास्थळी उपस्थित होते. त्याठिकाणी गैरअर्जदार सुभाष चव्हाण व त्यांचा मुलगा विशाल आले. या दोघांनी तुम्ही येथे खड्डा का तयार करीत आहे. आमच्या घरात पाणी घुसेल असे म्हटले. त्यावेळी सरपंच यांनी खड्डा झाल्यावर पाईप लाईन टाकून पाणी काढून देतो, असे सांगितल्यावरही ते ऐकायला तयार न होता, धक्का बुक्की करून जीवाने मारण्याची धमकी दिली. त्याठिकाणी उपस्थित दिपक प्रल्हाद चव्हाण यांनी तुम्ही गेल्यावर खड्डे बुजवतो. असे सांगितले. घटनास्थळी वाद घालण्यापेक्षा त्या ठिकाणावरून निघून आलो. व पोलीस स्टेशनला हजर होवून जबानी रिपोर्ट दिल्यावरून पोलिसांनी गैर अर्जदार यांच्याविरुद्ध कलम 115 (2), 352, 351 (2), 351 (3), 3 (5) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल (Filed a Case) केला असून, घटनेचा अधिक तपास बिट जमादार करीत आहे.