संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला सुट्टी देण्यात आली!
लातूर (Destitute Woman) : 27 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी अनोळखी बेवारस महिलेस काळे हॉस्पिटल, लातूर जवळून 108 या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, लातूर येथे अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. सदर महिलेस बोलता, चालता येत नव्हते व जनरलाइज विकनेस होता. त्यामुळे औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या अंतर्गत वार्ड नंबर 11 मध्ये अनोळखी बेवारस महिलेस दाखल करण्यात आले होते. त्यानुसार समाजसेवा अधीक्षक विभागाच्या (Social Service Superintendent’s Department) मार्फत सदर बेवारस रुग्णांची माहिती घेण्यात आली. परंतु रुग्ण माहिती देण्याच्या मनस्थितीत नव्हता व त्या रुग्णांसोबत कोणीही नातेवाईक किंवा ओळखीचा कोणताही पुरावा नव्हता. जवळपास नऊ महिने डॉक्टरांनी उपचार केला व सदर रुग्णास दुरुस्त केले. या कालावधीमध्ये रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिपरिचारिका, आया यांनी सुश्रृषा केली. व संबंधित डॉक्टरांच्या (Doctors) सल्ल्यानुसार रुग्णाला सुट्टी देण्यात आली.
रुद्र प्रतिष्ठान लातूर व समाजसेवा अधीक्षक विभागाचे सहकार्य!
रुग्ण बेवारस असल्याकारणाने समाजसेवा अधीक्षक विभागाच्या वतीने श्री प्रशांत येवरीकर, रुद्र प्रतिष्ठान लातूर या संस्थेत संपर्क साधून या संस्थेच्यावतीने सदर रुग्णास अहिल्यानगर येथील डॉक्टर राजेंद्र धामणे सेवा प्रतिष्ठान या ठिकाणी रुग्णाबाबतची संपूर्ण माहिती कळविण्यात आली. त्यानुसार विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते, उपाधिष्ठाता डॉ. अजय ओहाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन जाधव, डॉ. उमेश कानडे, विभाग प्रमुख पॅथॉलॉजी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्र प्रतिष्ठान लातूर व समाजसेवा अधीक्षक विभाग यांच्या सहकार्याने रुग्णवाहिकेमार्फत सदर बेवारस महिलेस पाठवण्यात आले. सदर कार्यवाही करिता समाजसेवा अधीक्षक श्री संजय कांबळे, श्री सुरेंद्र सूर्यवंशी व श्री रमेश इंगळे यांनी परिश्रम घेतले.