जुलूस- ए-मोहम्मदी व सामुहिक विवाह सोहळा
परभणी/गंगाखेड (Eid -e- Miladunnabi) : हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद -ए- मिलादुन्नबीनिमित्त (Eid -e- Miladunnabi) मुस्लीम समाज बांधवाच्या वतीने दि. १६ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ८ वाजता गंगाखेड शहरात जुलूस – ए- मोहम्मदी मिरवणूक व सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण मानव जातीला शांतीचा संदेश देणारे इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद -ए- मिलादुन्नबीच्या पूर्वतयारीसाठी दि. १२ सप्टेंबर गुरूवार रोजी मुस्लिम समाज बांधवांची बैठक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युनूस यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली. ईद -ए- मिलादुन्नबी (Eid -e- Miladunnabi) हा सण श्री गणेश उत्सवात श्री गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी येत असल्यामुळे दि. १६ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ८ वाजता तारू मोहल्ला येथून जुलूस – ए- मोहम्मदी मिरवणूक सुरू होणार आहे.
आझाद चौक परिसरात मिरवणूक पोहचल्यानंतर जैंदीपूरा, महेबूब नगर, बरकत नगर, रमजान नगर येथील मिरवणका जुलूस -ए- मोहम्मदी मुख्य मिरवणूकीत सहभागी होताच शहरातील विविध मस्जिदचे मौलाना, हाफीज यांच्या मार्गदर्शनाखाली ही जुलूस ए मोहमदी मिरवणूक नेहरू चौक, भगवती चौक, दिलकश चौक, डॉ. हेडगेवार चौक, शहीद भगतसिंग चौक, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, अदालत रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गॅरेज लाईन, चांद तारा चौक, रोशन मोहल्ला, भगवती कॉर्नर मार्गे बस स्थानक परिसरातील रजा मस्जिद येथे पोहचल्यानंतर संपूर्ण जगाच्या शांतीसाठी दुरुद ए पाकचे पठण, सामूहिक प्रार्थना करून मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे. या मिरवणुक व सामूहिक विवाह सोहळ्यात शहर व परिसरातील मुस्लिम समाज बांधवांसह सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल अशफाक, हाफीज गुलडरेज खान, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युनूस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जमीर, डॉ. शेख फेरोज, हसनैन कमिटीचे शेख मुस्तफा, शेख मुकरम, सय्यद चांद, शेख नदीम, शेख शब्बीर आदी पदाधिकाऱ्यांसह शहरातील सर्व मस्जिदचे मौलाना, हाफीज उपस्थित होते.
११ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म दिवस ईद -ए- मिलादुन्नबीच्या (Eid -e- Miladunnabi) पर्वावर हसनैन कमिटीच्या वतीने जुलूस ए मोहमदी मिरवणूक संपन्न झाल्यानंतर दुपारी जी.पी. गार्डन मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात गोरगरीब कुटुंबातील ११ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडणार असून या नवविवाहित जोडप्यांना हसनैन कमिटीच्या वतीने कपडे, भांडे, कपाट, कुलर, गादी, पलंग आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे.
मिरवणूकीत डिजे, डॉल्बीसारखे वाद्य वाजविण्यास मनाई
जुलूस ए मोहमदी (मिरवणूकीत) डिजे, डॉल्बीसारखे वाद्य वाजविण्यास सक्त मनाई करण्यात आली असून डिजे, डॉल्बीसारखे वाद्य लावणाऱ्या मिरवणुकींना मुख्य मिरवणूकीत प्रवेश दिला जाणार नाही असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.




