Latur crime :- औसा तालुक्यातील हासेगाव येथील सेवालय या एचआयव्ही संक्रमित (HIV infected) मुलां-मुलींच्या बालगृहामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल दोन वर्षात अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असून याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालगृहाचे संचालक रवि बापटले, ममता हॉस्पिटलमधील डॉक्टर याच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संचालक बापटले, ममता हॉस्पिटलमधील डॉक्टरसह सहा जणांवर गुन्हा दाखल : दोघांना घेतले ताब्यात
सदर अत्याचाराच्या घटनेबाबत औसा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील अल्पवयीन पिडित मुलगी ही औसा तालुक्यातील हासेगाव या ठिकाणी असलेल्या सेवालय बालगृह, येथे जुलै 2023 ते जुलै 2025 सतत दोन वर्षे रहिवासास होती. या काळात त्या कर्मचारी अमित महामुनी याने तिच्या इच्छेविरूद्ध तिच्यासोबत चार वेळा जबरी संभोग केला. तिने विरोध केला असता चापटाने मारहाण करून घटना कोणाला सांगू नको, म्हणून धमकी दिली. पिडितेने सदरची घटना संस्थाचालक रवि बापटले, सेवालय अधीक्षक रचना बापटले यांना सांगितली असता त्यांनी आरोपीस सहाकार्य करून पाठीशी घातले. पीडीतेला कोणतीही मदत न करता हा प्रकार कोणाला सांगू नको, म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर
यानंतर पिडितीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत चिठ्ठी लिहून तक्रार पेटीत टाकली असता कर्मचारी पूजा वाघमारे हिने ती चिठ्ठी वाचून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने फाडून टाकली. तसेच पिडित मुलगी आजारी पडून उलटया होत असताना एका महिला कर्मचाऱ्याने (नाव माहीत नाही) हिने तिला लातूर येथील ममता हॉस्पिटलमध्ये नेऊन तपासणी केली. पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर असताना डॉक्टरच्या संगनमताने लातूर येथे दवाखान्यात घेऊन जावून तिच्या तपासणीनंतर ती चार महिन्याची गरोदर आहे, माहित झाल्यानंतर तिच्या मनाविरुद्ध गर्भपात (Abortion) केला.
पीडित मुलगी ही धाराशिव जिल्ह्यातील मूळ रहिवासी
ती आपल्या गावी गेल्यानंतर हा प्रकार तिने आपल्या नातेवाईकांना सांगितला. आणि याबाबत धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्यात(Police station) गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा ढोकी पोलिसांनी औसा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात केला आहे. औसा पोलिसांनी या प्रकरणी सेवालयाचे संचालक रवी बापटले, अधीक्षिका रचना बापटले, आरोपी अमित महामुनी, पूजा वाघमारे, राणी (पूर्ण नाव माहिती नाही) आणि पीडितेचा गर्भपात करणारा लातूरच्या ममता हॉस्पिटल मधील डॉक्टर अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास सपोनि शिवशंकर मनाळे करीत आहेत. दरम्यान या प्रकरणी सेवालयाची बाजू जाणून घेण्याकरिता संचालक रवी बापटले यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.