गडचिरोली (Gadchiroli) :- जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर पोलीस ठाण्याअंतर्गत मोठया प्रमाणात दारूची (alcohol) तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच झिंगानूर पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकुन तब्बल २० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना काल २१ मे रोजी घडली. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे तर तिन आरोपी फरार झाले आहेत.
१२,४०,००० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला
कारे कोरके गावडे(३८) रा. झिंगानूर याला अटक केली आहे. समया बापू दुर्गम(३२) ,सडवली बापू दुर्गम(३२) दोघेही रा. झिंगानूर व रुपेश कांरेगला(३२) रा. देचलीपेठा ता. अहेरी हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. झिंगानूर येथील कारे कोरके गावडे याने अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने दारु घरात साठवून ठेवलेली आहे अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा व उपपोस्टे झिंगानूर यांचे संयुक्त पोलीस पथकाने गावडे यांच्या घराची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे १२,४०,००० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यानंतर पोलीस पथक समया बापू दुर्गम व सडवली बापू दुर्गम यांच्या घरी गेले असता, पोलीस पथक आल्याचा सुगावा लागल्याने दोघेही आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले.
पोलीसांनी त्यांच्या घराच्या अंगाणामध्ये उभे असलेले चारचाकी महिंद्रा बोलेरो वाहन क्र. ए.पी-१५-एम-१०८८ या वाहनाची तपासणी केली असता वाहनात ४,८०,००० रूपये किमतीची दारू आढळून आली. पोलिसांनी ३,५०,००० रूपये किमतीच्या वाहनासह ८,३०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही ठिकाणावरून २० लाख ७० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.