शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या अस्मानी सुलतानी संकटात
तुमसर (Heavy Rains) : तालुक्यात ३० ऑक्टोबर रोजीच्या परतीच्या पावसाने पुन्हा झोडपून काढले. शेतात उभे असलेले धान पीक आडवे पडले, कापलेल्या कडपा पाण्यात भिजल्या. भिजलेल्या कडपातील धान अंकुरले आहेत. परिणामी पुन्हा एकदा सुल्तानी व अस्मानी संकटामुळे शेतकरी हादरुन गेला आहे. पुढील दिवस सुद्धा संकटात आले आहेत.
खरीप हंगामाच्या प्रारंभापासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत पावसाने प्रचंड धक्का देत शेतकर्यांच्या नाकीनऊ आणले आहे. हलक्या व मध्यम, धानाची कापणी, बांधणी धडाक्यात सुरू असताना परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आहे.
हवामान खात्याने पावसाचा (Heavy Rains) अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकर्यांनी तातडीने धान कापण्यास सुरुवात केली. सध्या धानाच्या कडपा शेतात पडून आहेत. या कडपांची विल्हेवाट लावण्यापूर्वीच पावसाचे आगमन झाल्याने कडपा पाण्यात भिजल्या आहेत. या कडपा पुन्हा सुकविण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. पावसाचा फटका धानाच्या गुणवत्तेवर होणार असल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मुसळधार पावसासह वादळी वार्यामुळे कापणी योग्य धान शेतातच आडवे पडले. कडपातील धान अंकुरले आहेत. परतीच्या पावसाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले असून, यंदाचा हंगाम शेतकर्यांना मारक ठरला आहे.
परतीच्या पावसाने तुमसर-मोहाडी तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दि.२९ च्या मध्यरात्री पासुन ३० ऑक्टोबर पर्यंत तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतात कापून ठेवलेले धान पिकाच्या कडपा पाण्यात भिजल्या असून, धान अंकुरले आहेत. उभे धान पिके मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाले आहेत. परिमाणी शेतकर्यांत दु:खाची गडद छाया पसरली आहे. या पावसाने शेतकर्यांचे तोंडाशी आलेला घास हिरावला असून, शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
पावसाने वाढवली शेतकर्यांची चिंता!
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २९ च्या मध्यरात्री ते ३० ऑक्टोबर पर्यंत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली परिणामी कापनी केलेले धानाच्या कडपा पाण्यात भिजल्या व कोंब फुटले आहेत. (Heavy Rains) परतीच्या पावसामुळे शेतातील बांधांवर पाणी साचले असून, तुमसर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच होती.
धान पिकावर संकट; शेतकरी हवालदिल
तुमसर तालुका हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. यंदा चांगल्या पावसामुळे धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, परतीच्या अनपेक्षित पावसाने शेतकर्यांचे स्वप्न पुर्णत: पाण्यात मिळाले आहे. कापलेल्या धानाच्या कडपा पाण्याखाली गेल्याने धान पिकाला कोंब फुटले परिणामी पिकाची गुणवत्ता खराब होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. कापणी योग्य उभ्या पिकात पाणी साचल्यामुळे कमकुवत होऊन जमीनदोस्त झाले आहेत. परिणामी शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.




 
			

