हिंगोली (Hingoli) :- एक नव्हे दोन नव्हे तर तीन योजना राबवून देखील गावात उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई कमी करण्यात प्रशासनाला यश येत नसल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे युवकांनी चक्क जलजीवांच्या जल कुंभावर चढून पाण्यासाठी 27 फेब्रुवारी रोजी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शेवटी तहसीलदाराच्या मध्यस्थीने हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले.
औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगावात तीन जलकुंभ उभारलेले असून पाण्याचा उन्हाळ्यात ठणठणाट
औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या येहळेगाव सोळंके येथे गावातील काही युवकांनी गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी गावातील पाण्याच्या जलकुंभावर जाऊन आंदोलन सुरू केले. गावात पाणी मिळत नसल्याने लोकांनी अगोदरच जिल्हा प्रशासनाला ही बाब कळवली होती. परंतु कुठली दखल घेतली गेली नसल्याने युवकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे जल जीवन मिशन अगोदर गावात दोन योजनेअंतर्गत पाण्याचे जलकुंभ उभारण्यात आलेले आहेत. परंतु एकही जलकुंभ लोकांच्या तहान भागवण्यास कामी पडत नाही. शिवाय गावातील ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत देखील फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. परिणामी लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नित्याचीच झाली आहे. ग्रामपंचायतीवर वर्चस्व कुणाचेही असो पण टंचाईचा हा प्रश्न मिटत नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
मागील काही वर्षांपूर्वी येथे अशाच पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर युवकांना चक्क आमरण उपोषण (hunger strike) करावे लागले होते. गावात टँकर द्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करावा अशी मागणी त्यावेळी लावून धरण्यात आली होती. त्यानंतर लागलीच प्रशासनाने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. माजी ग्रामपंचायत सदस्य संजय सोळंके, शाहूराव सोळंके, स्व. दीपक मिसाळ व शाम सोळंके अशा चौघांनी मिळून येथे उपोषण सुरू केले होते. आता पुन्हा ग्रामस्थांवर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. विशेष म्हणजे आंदोलन करण्यात यावेळी काही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पुढे आहेत. गावात दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी सुरू केलेल्या आंदोलनानंतर तालुका प्रशासनाला माहिती मिळतात. तहसीलदार हरीश गाडे यांनी आंदोलन करताना जाऊन भेट दिली. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. गुरुवारी सुरू केल्या आंदोलनात आठ ते दहा युवक सहभागी झालेले असून ग्रामस्थांनी देखील मोठा पाठिंबा आंदोलनाला दिलेला आहे.