हिंगोली (Hingoli Police) : शहरासह जिल्हाभरात पोलिसांनी एकाच दिवशी विविध ३० ठिकाणी छापे टाकून गावठी दारु गाळपासाठी लागणारे १७२३ लिटर रसायन नाश केले आहे. तर २७३ लिटर गावठी दारू व ३११ बाटल्या देशीदारु असा २ लाख १० हजार ७५० रूपयाचा दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित (Hingoli Police) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ही दुसऱ्यांदा पोलिसांची मोठी कामगिरी झाली आहे.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात ग्रामीण भागातून गावठी दारुचे गाळप करून विक्री होत असून या सोबतच बेकायदेशीरपणे देशीदारू विक्री होत होती. याबाबत ग्रामीण भागातील गावकर्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या जात होत्या. त्यानंतर (Hingoli Police) पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी जिल्हयातील १३ पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेला दारु अड्डे उध्वस्त करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार आज २५ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मलपिल्लू, कपील आगलावे, विक्रम विठूबोने यांच्यासह १३ पोलिस ठाण्यांच्या अधिकार्यांनी विविध ३० ठिकाणी छापे टाकले. यामध्ये हिंगोली शहर ठाणे हद्दीत एका छाप्यात २१ हजाराचा, बासंबा ठाणे हद्दीत दोन छाप्यात ६७०० रूपयाचा, (Hingoli Police) हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एका छाप्यात ९८० रूपयाचा, सेनगाव दोन छाप्यात २१३६० रूपयाचा, औंढा नागनाथ दोन छाप्यात ८५०० रूपयाचा, गोरेगाव दोन छाप्यात १५०० रूपयाचा, नर्सी नामदेव एका छाप्यात ९८० रूपयाचा, वसमत शहर एकाच्या छाप्यात १६०० रूपयाचा, वसमत ग्रामीण तीन छाप्यात ४५५० रूपयाचा, हट्टा दोन छाप्यात १८४० रूपयाचा, आखाडा बाळापूर चार छाप्यात २८ हजाराचा, कुरूंदा दोन छाप्यात ११९० रूपयाचा, कळमनुरी एक छाप्यात १७०० रूपयाचा अशा १३ पोलिस ठाणे हद्दीत तर स्थानिक गुन्हे शाखेने सहा ठिकाणी मारलेल्या छाप्यात तब्बल १ लाख १० हजार ७५० रूपयाचा हातभट्टी दारूसाठा व सडके रसायन जप्त केले.
ग्रामीण भागातून गावठी दारुचे गाळप होत असल्याचे दिसून आले तर काही ठिकाणी दारू गाळपासाठी लागणारे सडके रसायन साठवून ठेवल्याचे आढळून आले. तसेच काही भागात बेकायदेशीररित्या देशीदारुची विक्री होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या ठिकाणावरून २७३ लिटर गावठी दारु जप्त केली असून १७२३ लिटर रसायन जमीनीवर सांडून नाश केले आहे तर देशीदारुच्या ३११ बाटल्या असा २ लाख १० हजार ७५० रूपयाचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित (Hingoli Police) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांच्या एकाच वेळी जिल्हाभरातील कारवाईमुळे अवैधदारू विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.