ऐन दसर्याच्या दिवशी घडली घटना; एकाला वाचविण्यात यश, दारोडा येथील घटना
दारोडा (Immersion Death) : देवी विसर्जन करण्यास गेलेल्या दोन युवकांचा वणा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. यावेळी एकाला वाचविण्यात यश आले. ऐन दसर्याच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथे वणा नदीच्या पात्रात घडली. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा परसली आहे.
मृतक हर्षल नथुजी चाफले (वय २४) आणि विशाल मनोहर पोहाणे (वय २५) अशी मृतांची नावे ओहत. भोजराज मेश्राम यास वाचविण्यात यश आले. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दारोडा येथील युवक दुर्गा माता मूर्ती विसर्जनासाठी गेले होते. त्यावेळी तीन युवक पाण्याचा अंदाज घेण्याकरिता वणा नदी पात्रात गेले. दरम्यान, नदी पात्रातील खोल खड्ड्यामुळे तिघांचाही अचानक पाण्यात तोल गेला आणि (Immersion Death) तिघेही नदीत वाहू लागले. ही बाब निदर्शनास येताच इतरांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली.
त्यावेळी दोन जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. एकाला वाचविण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोध सुरू केला. दोघांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत असताना ३ ऑक्टोबर रोजी एकाचा सकाळच्या सुमारास तर एकाचा दुपारच्या मृतदेह आढळला. (Immersion Death) दोघांच्याही मृतदेहांचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दोघांवरही दारोडा येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी नोंद केली. पुढील तपास वडनेर पोलिस करीत आहेत.
या दुर्घटनेत मृत्यू झालेला हर्षल चाफले हा सगुणा कंपनीत कार्यरत होता. तर विशाल पोहाणे हा टोल प्लाझावर कार्यरत होता. दोघांचाही कुटुंबासह आधार होता. विशालच्या वडिलांनी नापिकीमुळे आत्महत्या केली होती. आई आणि विशाल असे दोघे राहत होते. दोघांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. ऐन दसर्याच्या दिवशी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.