औताला जुंपून घेतलेल्या वृद्ध शेतकऱ्याची कृषी मंत्र्यांकडे भावना
-विश्वनाथ हेंगणे
हडोळती (Latur Farmer) : ‘एक क्विंटलचं पोतं चार हजार रुपयाला जातं… शेतीत काहीच मागं उरत नाही,’ अशी खंत व्यक्त करतानाच शेतमालाला भाव मिळावा, कर्ज माफ व्हावं, पेरणीला बी-खत मिळावं, अशी भावना हडोळतीच्या वृद्ध शेतकऱ्याने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी बोलताना व्यक्त केली. तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तुमचे कर्ज फेड करण्यासाठी मदत करू, अशी ग्वाही दिली.
‘स्वतःलाच औताला (Latur Farmer) जुंपून वृध्द दाम्पत्य करतंय आंतरमशागत!’ असे वृत्त रविवारी देशोन्नतीने दिले होते. या वृत्तानंतर सर्वत्र खळबळ उडाली. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबत नसतानाच, दस्तूर खुद्द सहकारमंत्र्यांच्या मतदार संघातील शेतकऱ्यांची भयानक परिस्थिती या वृत्तांत जगभर पसरली. रविवारपासून त्यानंतर अनेक माध्यमांमध्ये या वृद्ध शेतकरी दांपत्याची करुण कहाणी येत राहिली. राज्य विधिमंडळाच्या सभागृहापर्यंत या शेतकऱ्याची आर्त देशोन्नतीच्या वृत्तामुळे पोहोचली आणि अखेर राज्याच्या कृषिमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या अडचणीची दखल घेतली.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी हडोळती येथील (Latur Farmer) वृध्द शेतकरी अंबादास गोविंद पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. बैल बारदाना लावून आंतरमशागत करण्याइतपत पैसा नसल्याने अंबादास व मुक्ताबाई हे दाम्पत्य खांद्यावर जोडत आपल्या शेतात कोळपणी करत होते. ही व्यथा संपूर्ण जगभर पसरल्याने अखेर कृषिमंत्री कोकाटे यांनी अंबादास पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला.
एकूण शेती किती, त्यावर किती कर्ज आहे. शेतीचे उत्पन्न किती निघते? असे प्रश्न विचारल्यानंतर साडेचार एकर शेती असून 40 हजारांचे कर्ज आहे. तसेच शेतीतून निघालेले उत्पन्न शेतीसाठीच पुरत नाही, अशी खंत अंबादास पवार यांनी बोलून दाखविली. एक क्विंटल सोयाबीनला चार हजार रुपये येतात. शेतीतून निघालेले उत्पन्न शेतीसाठी खर्चून काहीही शिल्लक राहत नाही, असे सांगताना शेतमालाला भाव मिळावा, कर्ज माफ व्हावं, पेरणीसाठी बी-खत मिळावा, अशी भावना त्यांनी कृषिमंत्र्यांकडे व्यक्त केली.
सध्या तुम्हाला कोणती मदत करता येईल, असे विचारले असता कोण पण खुरपणाला पैसा नाही, म्हणून आम्ही खांद्यावर जो घेऊन कोळपण करतोय. बैलाने 3000 रुपये हजेरी आहे, ते परवडत नाही. ट्रॅक्टरने अंतर मशागत होत नाही, हे वास्तव अंबादास पवार यांनी कृषिमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. यावर (Latur Farmer) कृषिमंत्र्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्याकडे पाठवून आपल्या अडचणी ऐकून घेऊन मदत करण्याची ग्वाही दिली.