महसूल आयुक्तालयासाठी शुक्रवारी लक्षवेधी धरणे आंदोलन!!
लातूर (Latur) : गेल्या पंधरा वर्षांपासून मराठवाड्यात दुसरे स्वतंत्र विभागीय कार्यालय (Divisional Office) स्थापन करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड येथे आयुक्तालय स्थापणार, असे मान्य केल्यामुळे लातूरकरांमध्ये तीव्र संताप उसळला असून गुणवत्तेच्या आधारावर लातूरलाच महसूल आयुक्तालय व्हावे. यासाठी शुक्रवारी लक्षवेधी धरणे आंदोलनाचा (Dharna Movement) निर्धार लातूरकरांनी केला आहे.
आयुक्त कार्यालयासाठी पंधरा वर्षांपासून संघर्ष.!!
बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. शरद इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गुणवत्तेच्या आधारे लातूर येथेच मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन झाले पाहिजे. लातूरकरांनी गेली पंधरा वर्षांपासून आयुक्त कार्यालयासाठी संघर्ष केला आहे. उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केल्या. लातूर, उस्मानाबाद, बीड परिसरातील नागरिकांचा तीव्र भावना विचारात घेऊन तत्कालीन तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासाठी योग्य ठिकाण कोणते याबाबत श्री उमाकांत दांगट यांची समिती नेमली. या समितीने शासनाकडे (Government) अहवाल दिलेला असून, तो अहवाल खुला करावा. या अहवालात गुणवत्तेच्या आधारावर लातूर येथे आयुक्त कार्यालयासाठी सकारात्मक शिफारस करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीची, लातूरच्या जनतेची तीव्र भावना आणि आतापर्यंतचा इतिहास याचे अवलोकन न करता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडतात बैठकीत उमटले.
स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करावे.!!
लातूर येथेच विभागीय महसूल आयुक्त कार्यालय (Office of Divisional Revenue Commissioner) स्थापन करण्यासाठी दिनांक 21/02/2025 शुक्रवार रोजी जिल्हा न्यायालयाच्या समोर सकाळी 11 ते दुपारी 01 वाजेपर्यंत लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, समितीच्या वतीने लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जिल्ह्यातील आमदार, खासदार यांना सोबत घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार आहे. मराठवाड्याचा समतोल विकासासाठी लातूर येथेच दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करावे. यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.
विविध पक्ष व संघटनांनी सहभागी व्हावे…
शुक्रवारच्या लक्षवेधी धरणे आंदोलनात विधिज्ञांसोबत विविध पक्ष व संघटनांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले.
या बैठकीत ॲड.अण्णाराव पाटील, ॲड. व्यंकट बेंद्रे, ॲड. बळवंत जाधव समितीचे निमंत्रक ॲड. उदय गवारे यांनी विचार मांडले. या बैठकीस प्रामुख्याने ॲड. मधुकर राजमाने, ॲड. चंद्रकांत आगरकर, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, ॲड. विजय जाधव, ॲड. कमलाकर सोनवणे, ॲड. मनीषा दिवे पाटील, ॲड. तृप्ती इटकरी, ॲड. नरेश कुलकर्णी, ॲड. बी. जी. कदम, ॲड. संजय पाटील, ॲड. गणेश यादव, ॲड. परवेज पठाण, ॲड. आनंद खांडेकर, ॲड. धनराज झाडके, ॲड. भालचंद्र कवठेकर, ॲड. रमेश गायकवाड, ॲड. शेखर हविले, ॲड.बि.व्ही. सूर्यवंशी, ॲड. बालाजी पांचाळ, ॲड. गुरुलिंग काळे , ॲड.भगवान साळुंखे, ॲड. प्रदीप पाटील, ॲड. अनंत बावणे, ॲड. सुभेदार मांदळे, ॲड. सोनवणे एस.डी. , ॲड. हरी निटुरे, ॲड. राम पाटील आदी उपस्थित होते.




