नांदुरा येथील प्रकार: मृतदेहाची विटंबना करणाऱ्यावर कारवाईची लिंगायत समाजाची मागणी!
अहमदपूर (Lingayat Society) : अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथील भूमिहीन वृद्ध महिला लक्ष्मीबाई हाळे यांच्या अंत्यविधीस अडथळा आणून मृतदेहाची विटंबना करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदारांकडे करण्यात आली. दरम्यान प्रशासनाने काही समाजकंटकांवर शासकीय (Govt) कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथील वृद्ध भूमीहीन महिला लक्ष्मीबाई हाळे यांचे 21 जुलै रोजी सकाळी दहा वाजता निधन झाले. मात्र गावात लिंगायत स्मशानभूमी नसल्याने व अंत्यविधीसाठी जागा नसल्याने रेड्डी समाजालगत असलेल्या गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्याची मागणी लिंगायत समाजाने (Lingayat Society) केली. मात्र गावातील काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या ठिकाणी अंत्यसंस्कारास विरोध करून अडवणुकीची भूमिका घेतली. यात तहसीलदार उज्वला पांगारकर (Tehsildar Ujjwala Pangarkar) व उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायभोळे यांनी मध्यस्थी केली, मात्र काही लोकांनी ताठर भूमिका घेत तेथे अंत्यसंस्कारास विरोध केला. त्यामुळे प्रशासनाने रेड्डी समाजाची वीस गुंठे जागा सोडून उर्वरित गायरान जमिनीत सदर महिलेचा अंत्यविधी उरकला व त्यानंतर संबंधितावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या सर्व प्रक्रियेत सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत जवळपास 12 तास अंत्यविधीविना मृतदेह ठेवावा लागला. त्यामुळे मृतदेहाची विटंबना झाल्याचा आरोप करीत या प्रकरणातील समाजकंटकांवर मृतदेह विटंबनेचाही गुन्हा दाखल (Filed a Case) करावा, अशी मागणी लिंगायत समाजासह इतर समाजातील नागरिकांनी (Citizens) केली आहे.
या निवेदनावर शिवकुमार उटगे, ओम पुणे, भाजपाचे ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, ऍड. सिनेट सदस्य निखिल कासनाळे, नगरसेवक अभय मिरकले, संदीप चौधरी, रवी महाजन, राहुल शिवपुजे, विकास महाजन काशिनाथ गाढवे, प्रा.विश्वंभर स्वामी, लक्ष्मीकांत कासनाळे, किशोर कोरे, राजकुमार पुणे, राजकुमार कल्याणी, सुनील तत्तापुरे, वैजनाथ चौधरी, विठ्ठल गुडमे, रवी रोडे, बबलू पुणे, कपिल नाकसाखरे यांच्यासह लिंगायत बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.