मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला समर्थन
परभणी (Manoj Jarange Patil) : मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार २२ सप्टेंबर आणि सोमवार २३ सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची (Parbhani bandh) हाक देण्यात आली आहे. या बाबत सकल मराठा समाजाच्या दोन गटाकडून शनिवार २१ सप्टेंबर रोजी परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना निवेदन देण्यात आले.
पोलीस अधीक्षकांना निवेदन
मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील वर्षभरापासून लढा देत आहेत. सत्तेतील विविध मंत्र्यांनी भेटी घेत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. मात्र अद्याप शब्द पाळलेला नाही. आरक्षणाची अंतिम लढाई मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या माध्यमातून सुरू केली आहे. सगेसोयरे अधिसुचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागु करावे, अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटूंबातील सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, मागेल त्या गरजवंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, मराठा आणि कुणबी एकच आहे हा अध्यादेश पारित करावा अशा मागण्या करत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. रविवार २२ सप्टेंबर आणि सोमवार २३ सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सर्व व्यापारी बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे
पाथरीत बंद; अखंड मराठा समाजाची हाक
पाथरी : मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी रविवार २२ सप्टेंबर रोजी पाथरी बंदची (Parbhani bandh) हाक देण्यात आली आहे. या संदर्भात अखंड मराठा समाज पाथरी तालुक्याच्या वतीने शनिवार २१ सप्टेंबर रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.