कंपनीचे व्यवस्थापन महादलिंग स्वामी देवस्थान मंदिर व्यवस्थापनास जुमानत नसल्याचे उघड!
परभणी (Monte Carlo Stone Crusher) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातून जाणार्या समृध्दी महामार्ग बनविण्यासाठी गौर येथील महादलिंग स्वामी मंदिर देवस्थानची 18 एकर जमीन मॉन्टो कार्लो कंपनीने भाडेतत्वावर घेतली आहे. या बाबत करार करण्यात आला आहे. देवस्थानची एकूण 36 एकर जागा आहे. 18 एकर जागेचा भाडेतत्वाचा करार झालेला असताना संबंधित कंपनीकडून देवस्थानच्या उर्वरित जागेवर उत्खनन केले आहे. स्टोन क्रेशर टाकण्यात आले आहे. कंपनीचे व्यवस्थापन देवस्थानच्या व्यवस्थापनाला जुमानत नसल्याचे उघड झाले आहे.
कंपनीला दंडात्मक नोटीस बजावली!
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील गौर येथे मॉन्टो कार्लो कंपनीचे स्टोन क्रेशर अवैध रित्या सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सदर स्टोन क्रेशर बंद करण्यात आले होते. कंपनीने परवानगी शिवाय जास्तीचे उत्खनन केल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी कंपनीला दंडात्मक नोटीस बजावली असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत माहिती देताना सांगितले. मात्र प्रत्यक्षात कंपनीचे स्टोन क्रेशर सुरू असल्याचे दिसत आहे. देवस्थानशी निगडित समाज बांधवांना विचारात न घेता त्यांना अनभिज्ञ ठेवून 9 ते 10 एकर जमिनीवर खोदकाम करत हजारो ब्रास गौण खनिज उपसा केले आहे. सदर उत्खनन करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला ठरविण्यात आलेला नाही. देवस्थानास भाड्यापोटी देण्यात येणारी रक्कम देखील कंपनीने थकविली आहे. भाड्याने न घेतलेल्या उर्वरित जमिनीवर नव्याने स्टोन क्रेशर मंदिर प्रशासनाच्या (Temple Administration) परवानगी शिवाय उभारण्यास सुरुवात केली आहे.
कंपनी विरोधात आंदोलनाचा इशारा!
संबंधित मॉन्टो कार्लो कंपनीचे व्यवस्थापन (Monte Carlo Company Management) पीक योग्य असणार्या जमिनीवर परस्पर अधिकचे खोदकाम करत आहे. कोणाला ही न जुमानता खोदकाम चालू आहे. खोदकाम करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्या बाबत कुठलीही पारदर्शकता नाही. भाड्यापोटी देण्यात येणारी रक्कम ही कंपनीने थकविली आहे. यात काही प्रशासकीय अधिकार्यांसोबतच (Administrative Officer) दलालांचा देखील सहभाग आसावा. कंपनी विरोधात लवकरच आंदोलन छेडू.
– एन.ए. सोनटक्के, महादलिंग स्वामी मंदिर देवस्थान समाज बांधव