परभणी (Eid-e-Milad) : गंगाखेड तालुक्यातील ईद ए मिलादनिमित्त रब्बीउल अव्वल या इस्लामिक महिन्यातील ६ तारखेला अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गाहवर मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने पार पडलेल्या छट्टीच्या कार्यक्रमात गंगाखेड वासियांच्या वतीने चादर अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.
इस्लामिक कॅलेंडरमधील महत्त्वपूर्ण महिना असलेल्या रब्बीउल अव्वल या महिन्याच्या १२ तारखेला इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन “ईद-ए-मिलाद” म्हणून साजरा केला जातो. या महिण्याच्या ६ तारखेला छट्टी म्हणून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याचे औचित्य साधून गंगाखेड येथील नगरसेवक सय्यद अकबर, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर, सय्यद जहीर, नसीर बेग, सय्यद मोईज, रेहान बेग, सय्यद अमीन आदींनी हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दरबारातील गद्दीनशीन खादीम हाजी सय्यद दिलनवाज (एजाज अहमद) चिश्ती यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार ३० ऑगस्ट रोजी अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या मजार शरीफवर चादर अर्पण करून छट्टी साजरी करत जगभरात शांतता, बंधुभाव आणि ऐक्य नांदो अशी सामूहिक प्रार्थना केली.
खादीम हाजी सय्यद दिलनवाज (एजाज अहमद) चिश्ती यांनी जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत शांतता, सलोखा व मानवतेच्या संदेशावर भाष्य करत जीवन जगतांना आपण सर्वांनी हजरत मोहंमद पैगंबरांच्या शिकवणीचे दैनंदिन जीवनात आचरण करावे असे आवाहन केले.




