परभणी (Parbhani) :- बेवारस मृतदेहाचे वारसदार म्हणून महापालिकेने सदर मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत दिली आहे. जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३९ बेवारस मृतदेहांच्या (dead body) अंत्यसंस्कारासाठी प्रति मृतदेह दिड हजार रुपये एवढी रक्कम देण्यात आली आहे.
प्रति मृतदेह दिड हजार रुपये एवढी रक्कम
शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन व इतर सार्वजनिक ठिकाणी बेवारस व्यक्ती आढळून येतात. कधी वेळेस कोणत्या तरी कारणाने सदर व्यक्तींचा मृत्यू (Death) होतो. बेवारस मृतदेहाबाबत पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात येते. संबंधित पोलीस स्टेशनमधील कर्मचारी घटनास्थळी जात मृतदेहाचा पंचनामा करतात. या बाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात येते. बेवारस व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ते प्रयत्न केले जातात. शोध पत्रिका काढून ओळख पटविण्याचे काम होते. बेवारस मृतदेह शितगृहामध्ये तीन दिवस ठेवले जाते. या कालावधीत मृतदेहाची ओळख पटली नाही किंवा कोणीही नातेवाईक पुढे आले नाही अशा वेळी पोलीस मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी (funeral) पुढे येतात. सदर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून महापालिकेला पत्र दिले जाते.
व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ते प्रयत्न
हे पत्र प्राप्त झाल्यावर ऑनलाईन पध्दतीने दिड हजार रुपयांची रक्कम संबंधिताला दिली जाते. एवढ्या कमी रक्कमेत अंत्यसंस्कार होत नाहीत. मात्र सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीचे भान ठेवून महापालिकेकडून बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी रक्कम दिली जाते. जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी ८, मार्च २, एप्रिल ३, मे ४, जून २, जुलै ७, ऑगस्ट २, सप्टेंबर २ आणि नोव्हेंबर महिन्यात ३ अशा एकूण ३९ बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी मनपाने रक्कम दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात एकही बेवारस मृतदेह (Desolate bodies) आढळून आला नाही. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लागणार्या रक्कमेकरीता शहर महापालिकेकडून दर वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुद केली जाते.