उत्पादन शुल्क उपाधीक्षकांनी धमकी दिल्याच्या निषेधार्थ घातले लोटांगण!
लातूर (Liquor Ban Case) : दारूबंदी प्रकरणात दुटप्पी भूमिका घेता, असे म्हणत उजना येथील बियर बार परवाना रद्द करण्याच्या मागणी प्रकरणात ‘लय अवघड होईल,’ अशी धमकी दिली. तसेच आपणास मानसिक त्रास देऊन अपमानित करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क च्या उपाधीक्षक मुपडे यांच्या विरोधात कारवाई करावी, तसेच उजना येथील बियर बार परवाना रद्द करावा, या (Liquor Ban Case) मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्याने बुधवारी (दि.18) चक्क जिल्हा प्रशासनाला साष्टांग दंडवत घातला.
अहमदपूर तालुक्यातील उजना येथील दारूबंदीसाठी (Liquor Ban Case) सामाजिक कार्यकर्ते बलभीम नामदेवराव कासले यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आपला लढा चालविला आहे. उजना येथील दारू विक्री थांबवा, अशी मागणी केल्यानंतर उजना येथील एक बियर बारचा परवाना रद्द करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कासले यांनी लावून धरली. राज्य उत्पादन शुल्क विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या मर्मावर बोट ठेवणारी ही मागणी ठरल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने चक्क बिअरबार चालकाशी संगनमत करीत कासले यांनाच टॉर्चर करण्यास सुरुवात केली, असा आरोप कासले यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केला होता.
बियर बार परवाना रद्द (Liquor Ban Case) करावा या मागणीसाठी निवेदन दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपाधीक्षक मुखडे यांनी आपणास सदर प्रकरणी समक्ष जवाब घेण्यासाठी बोलावले. त्यांच्या कक्षामध्ये बोलावून आपणास अपमानास्पद वागणूक दिली. उजना येथील दारूबंदी बाबत तुमची भूमिका दुटप्पी आहे, असे ते मला म्हणाले तसेच सदर प्रकरणात ‘लई अवघड होईल’, असे म्हणत माझ्यावर दबाव टाकला. इतकेच नव्हे तर माझ्यावरच कारवाईच्या धमक्याही त्यांनी दिल्या, असे बलभीम कासले यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनुसार बुधवारी बलभीम कासले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क लोटांगण घालत लक्षवेधी आंदोलन केले. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने दारूबंदीसाठी पाठपुरावा केल्यानंतर त्या कार्यकर्त्यास किती टॉर्चर केले जाते, याचे उत्तम उदाहरण या प्रकरणाकडे पाहता येईल. बलभीम कासले यांच्या या लोटांगणाची जिल्हा प्रशासन कितपत दखल घेते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अधीक्षकांचा संपर्क होऊ शकला नाही…
उजना येथे मोठया प्रमाणावर अवैध दारू विक्री (Liquor Ban Case) केली जात होती, यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. यावर आळा घालण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते बलभीम कासले यांनी मागील पाच वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा चालविला आहे. मात्र संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडूनच आपणास ‘टॉर्चर’ केले जात असल्याचा आरोप कासले यांनी केला आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.