सेनगाव पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Sand Smugglers Attack) : सेनगाव तालुक्यातील भानखेडा शिवारात महसुलच्या पथकाने वाळूचे टिप्पर पकडल्यानंतर वाळू तस्करांनी केलेल्या मारहाणीत ग्राम महसुल अधिकारी जखमी झाल्याने सेनगाव पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी ६ जनांवर शुक्रवारी (Sand Smugglers Attack) गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर हिंगोलीत शुक्रवारी आणले असता इंदिरा गांधी चौकात शासकीय वाहन बंद पडल्याने पोलिसांसमवेत महसुलच्या पथकाने दोन्ही आरोपींची वरात काढून हजर केले.
अनेक ठिकाणी रेतीचे उत्खन्न करून टिप्पर, ट्रॅक्टर आदी वाहनातून सर्रासरित्या वाहतुक केली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल यंत्रणेला सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सेनगाव ते येलदरी मार्गावर एका टिप्पर मधून (Sand Smugglers Attack) अवैधरित्या वाळूची वाहतुक होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांना मिळाल्याने ३१ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ३ ग्राम महसुल अधिकार्यासह त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेतली.
भानखेडा शिवाराजवळच हे वाळूचे टिप्पर दिसुन आल्याने चालकाला थांबविण्याच्या सूचना देऊन सदर टिप्पर पोलिस ठाण्यात घेऊन चालण्याबाबत सूचना दिल्या. याचवेळी ग्राम महसूल अधिकारी अजय चोरमारे यांना टिप्परमध्ये बसविण्यात आले. उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांचे शासकीय वाहन पुढे आणि टिप्पर मागे येत होते. याचवेळी पांढर्या रंगाची कार स्कार्पिओ वाहन क्रमांक एमएच २६ बीसी ९५६६ ही घटनास्थळी पोहचली. यामधून दोघेजण खाली उतरले.
तसेच दुसरी काळ्या रंगाची स्कार्पिओ वाहन क्रमांक क्रमांक एमएच ३८ एडी ८०५९ त्यातून उतरलेल्या नवनाथ राठोड व इतरांनी पोलिस ठाण्याकडे जात असलेले टिप्पर रस्त्यात थांबवून त्यातील बसलेले ग्राम महसुल अधिकारी अजय चोरमारे यांना खाली ओढून अश्लिल शिवीगाळ करून दगडाने मारहाण करण्यात आली. अचानक त्यांना होत असलेल्या मारहाणीमुळे महसुलच्या पथकाने प्रतिकार न केल्याने या सहा जणांनी वाळूचे टिप्पर घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.
या घटने संदर्भात ग्राम महसुल अधिकारी अजय चोरमारे यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात १ ऑगस्टला मध्यरात्री दिलेल्या फिर्यादीवरून शुभम खिल्लारे रा. ब्रम्हवाडी, नवनाथ राठोड रा. बोडखा यासह इतर ४ अनोळखी आरोपी विरूध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासह मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याकरीता जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक मस्के, टी. के. वंजारे, ओमनाथ राठोड, गृहरक्षक दलाचे जवान, रहाटे, डाखोरे यांनी तपासचक्र फिरवले.
गुन्ह्यातील आरोपी विदर्भात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शुक्रवारी नवनाथ राठोड, भूषण खिल्लारे या दोन आरोपींना पानकनेरगाव शिवारातून अटक केली. विशेष म्हणजे या आरोपींना हिंगोलीत आणल्यानंतर इंदिरा गांधी चौकामध्ये शासकीय वाहन अचानक बंद पडले. त्यामुळे खुद्द उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी बी. के. वाबळे, अतुल जाधव, अजय चोरमारे, नवले, बी. एस. काळे व पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या हातात बेड्या ठोकून प्रमुख मार्गावरून उपविभागीय अधिकारी कार्यालयात नेले. त्यानंतर या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पवन चाटसे हे करीत आहेत.