शालार्थ आयडी घोटाळा: चौकशीनंतरच दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी!
लातूर (School ID Scam Case) : राज्य सरकारने लातूरसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या शालार्थ आयडी घोटाळा चौकशीसाठी एसआयटी अर्थात् विशेष चौकशी पथक नेमल्याची घोषणा करतात राज्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली असून सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील शिक्षण विभागातील अ व ब वर्ग दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट पासून हे अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी एसआयटी स्थापन!
‘शिक्षण संस्था अन् अपात्र गुरुजींचा होणार पर्दाफाश!’ असे म्हणत, दैनिक देशोन्नती’ने ‘लातूर शालार्थ आयडी घोटाळा; अखेर एसआयटी स्थापन!’ असे वृत्त शुक्रवार दिनांक 8 ऑगस्टच्या अंकात दिले होते. राज्य सरकारने (State Govt) गुरुवारी (दि.7 ऑगस्ट 2025) शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन केली असून, त्याची अधिकृत घोषणा शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांनी केली. यात लातूरसह राज्यातील नागपूर नाशिक जळगाव मुंबई व बीड आधी ठिकाणी झालेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखाली हे चौकशी पथक नेमण्यात आले. या पथकामध्ये राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा हे सदस्य तर शिक्षण आयुक्तालयातील प्रशासन, अंदाज व नियोजन विभागाचे सहसंचालक हारून आतार हे सदस्य सचिव आहेत.
जोपर्यंत, कार्यवाही होत नाही तोपर्यंत, सामूहिक रजा आंदोलन सुरू…
दरम्यान, चौकशी समिती (Inquiry Committee) नेमताच राज्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या अधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. लातूर येथेही या अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना रीतसर निवेदन दिले. विशेष म्हणजे या निवेदनावर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर दत्तात्रय मठपती यांच्यासह 18 अधिकाऱ्यांची नावे आहेत. मात्र प्रत्यक्षात या निवेदनावर 8 अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्यात चौकशी विना कोणताही खुलासा न घेता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून कारवाई करावी. एसआयटीने चौकशीनंतरच दोषी असणाऱ्या वर कारवाई करावी. 1 ऑगस्ट रोजी संघटनेने दिलेल्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करावी, अशा मागण्यांचे हे निवेदन आहे. संघटनेच्या निवेदनावर जोपर्यंत, कार्यवाही (Proceeding) होत नाही तोपर्यंत, सामूहिक रजा आंदोलन सुरू राहील असे या निवेदनात म्हटले आहे.
दोषींना पाठीशी घालण्यासाठी…
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात (School ID Scam Case) ज्यांनी अनियमित्ता केली त्यांची पडताळणी एसआयटीने चालविली आहे. एसआयटीमध्ये राज्यातील वरिष्ठ अधिकारी आहेत, ते दोषींवरच कारवाई करतील. मात्र अधिकाऱ्यांनी सामूहिक गरजेचे आंदोलन करून दोषींना पाठीशी घालण्याचे काम चालविले आहे. हे तर्कसंगत, न्यायसंगत व कायद्याला धरून नाही. सर्वसामान्य नागरिक, कर्मचारी यांना वेठीस धरण्याचे हे षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया लातूर मधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाचे तक्रारकर्ते तथा सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी विठ्ठल भोसले यांनी दैनिक ‘देशोन्नती’शी बोलताना व्यक्त केली.