सिहोरा पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची तीव्र कमतरता
हरदोली/सिहोरा (Sihora Police) : तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे सध्या मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेमुळे कमालीच्या ताणतणावाखाली कार्यरत आहे. अधिकृतपणे मंजूर असलेल्या ५५पदांच्या तुलनेत, सध्या केवळ ३३ खाकी वर्दीतील कर्मचारी कार्यरत आहेत. याचा थेट परिणाम ४१ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेवर होत असून, सीमेवरील या संवेदनशील (Sihora Police) पोलीस ठाण्यासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
सिहोरा पोलीस ठाणे (Sihora Police) हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. विशेषतः, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा आणि महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचा काही भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. अशा संवेदनशील ठिकाणी, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना त्वरीत हाताळण्यासाठी परिपूर्ण मनुष्यबळ असणे अत्यावश्यक आहे.
सध्याच्या परिस्थितीत, जर सीमेवर किंवा कार्यक्षेत्रात कोणतीही मोठी किंवा नक्षलवादाशी संबंधित अनुचित घटना घडल्यास, त्याला तातडीने आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यासाठी सिहोरा पोलीस ठाण्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पोलिसांच्या मानसिक ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा या मनुष्यबळाच्या कमतरतेबद्दल आवाज उठवला आहे. सीमेवरील आणि नक्षलग्रस्त भागाला लागून असलेल्या या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यासाठी तातडीने मंजूर पदे भरण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परिपूर्ण मॅन पॉवरअभावी पोलिसांना होणारा त्रास आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेवर होणारा संभाव्य परिणाम पाहता, गृह विभागाने आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाने (Sihora Police) सिहोरा पोलीस ठाण्यातील रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा, सीमेवरील या महत्त्वाच्या ठाण्याची ‘दमछाक’ यापुढेही सुरूच राहील आणि कायदा सुव्यवस्थेची घडी विस्कळीत होण्याची भीती कायम राहील.
मंजूर पदे ५५ कार्यरत फक्त ३३
सिहोरा पोलीस ठाण्यासाठी (Sihora Police) एका पोलीस निरीक्षक, एका पोलीस उपनिरीक्षक आणि ५३ पोलीस शिपाई अशी एकूण ५५ पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या येथे पोलीस निरीक्षक सह केवळ ३३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. याचा अर्थ, आवश्यक मनुष्यबळापैकी जवळपास ४० टक्के पदे रिक्त आहेत. या तुटपुंज्या मनुष्यबळावर ४१ गावांची सुरक्षा आणि दैनंदिन कामकाज सांभाळण्याची कसरत सिहोरा पोलिसांना करावी लागत आहे.
कायदा सुव्यवस्थेची कसरत आणि दमछाक
एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रासाठी अपुरे मनुष्यबळ असल्याने, पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखताना कमालीचा त्रास आणि दमछाक होत आहे. गस्त घालणे, गुन्ह्यांचा तपास करणे, शांतता समित्यांची बैठक घेणे आणि प्रशासकीय कामकाज सांभाळणे या सर्व जबाबदार्या पार पाडताना कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. एका पोलिसाला अनेक गावांसाठी काम करावे लागत असल्याने वेळेवर आणि प्रभावी प्रतिसाद देणे अनेकदा शक्य होत नाही.