Ettapalli :- धान पिकाची जोमाने वाढ होण्यासाठी सद्या युरीया खताची मागणी वाढली आहे.त्यामुळे युरीया खत उपलब्ध होताच एटापल्ली येथे युरीया खतासाठी शेतकर्यांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसुन येत आहे. मात्र अनेक गरजु शेतकर्यांना युरीया खत मिळत नसल्याने शेतकर्यांची नाराजी व्यक्त होत आहे.
आधार कार्डावर वितरीत करण्यात आले खत
दिनांक ३० ऑगस्ट २०२५रोजी कृषी विभागाने (agriculture department)प्रत्येक कृषी केंद्रास १०० बॅग युरिया खताचा पुरवठा केला. युरीया खत उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच आज सकाळी ११वाजता आधार कार्डाच्या निकषांवर युरिया खताची विक्री करण्यात आली. परंतु युरिया खताकरिता एवढी गर्दी झाली होती की, रांगेतील शेतकर्यांना धक्का खावा लागत होता. तन्मय कृषी केंद्राचे संचालक विजय अतकमवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी शोकांतिका व्यक्त केली. ‘आम्ही शेतकरी यांच्या गरजेप्रमाणे मागणी केली आहे. परंतु शासकीय स्तरावरून मागणी प्रमाणे पुरवठा झाला नाही. या सत्रात पहिलाच पुरवठा आहे. म्हणून मोठी गर्दी झाली आहे.
दोन तासातच शंभर बॅगा संपल्याचे त्यांनी सांगितले. एटापल्ली तालुक्यातील २७४ गावात प्रत्येकी १०० बॅग गरज गृहीत धरले तरी गावाच्या संख्येनुसार २७४०० बॅगा आवश्यक आहेत. परंतु थातूर-मातुर पुरवठा आहे व शेती करणारे उत्पादन कसे वाढवतील हा प्रश्न शेतकरी (Farmer)वर्गात निर्माण झाला आहे. तेंव्हा कृषी विभागाने पोटतिडकीने लक्ष घालून समस्या दूर करण्यासाठी उपाय योजना करावी. अशी मागणी गरजु शेतकरी करीत आहेत. पुर्ण तालुक्यातील कृषी केंद्राची संख्या जेमतेम दहा असुन प्रत्येक केंद्राने युरीया खताची मागणी केली आहे.