‘फुले’ सिनेमा संदर्भात ‘अंनिस’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लातूर (Phule Movie) : खरे तर फुले दांपत्य कधीच ब्राह्मणद्वेष्टे नव्हते, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून वारंवार सिद्ध केले आहे. तरीही काही कट्टर जातीयवादी संस्थांनी विरोध करून फुले या सिनेमाचे 11 एप्रिल म्हणजे महात्मा फुले जयंतीदिनी होणारे प्रदर्शन थांबविले आहे. त्यामुळे फुल्यांनी केलेले समाज उद्धाराचे आणि स्त्री- शुद्रांच्या उद्धाराचे कार्य तथाकथित उच्चवर्णीयांच्या आजही पचनी पडत नाही, हेच यावरून दिसून येते, असा पलटवार (Phule Movie) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. त्यामुळे फुले चित्रपट आहे तसाच दाखवावा, अशी मागणी समितीच्या शिष्टमंडळाने लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विधवा पुनर्विवाह, केशवपन विरोधी चळवळ, बालहत्या प्रतिबंधक गृह, शेतकऱ्यांसाठीचे कार्य यासारख्या फुले दांपत्यांनी केलेल्या चळवळी याचे द्योतक आहेत. म्हणून ‘फुले’ हा ( Phule Movie) सिनेमा कोणताही बदल न करता ताबडतोब प्रदर्शित करावा, म्हणून लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.
यावेळी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, राज्य सरचिटणीस रुकसाना मुल्ला, राज्य कार्यवाह उत्तरेश्वर बिराजदार, दिलीप आरळीकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता आरळीकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ. दशरथ भिसे, शहर कार्याध्यक्ष डॉ. गणेश गोमारे, जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले, बाळासाहेब जगताप आणि नारी प्रबोधनच्या सर्व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.