Karanja :- येथील ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेचा परिचय करवून दिला आहे. त्यांनी रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला मोठ्या चातुर्याने काही तासातच ताब्यात घेतले असून, तिला २२ जून रोजी पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तिच्या ३५ वर्षीय आईने कारंजा ग्रामीण पोलिसात फिर्याद नोंदवली
प्राप्त माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील एका गावातील रहिवासी १७ वर्ष ८ महिने वयाची एक अल्पवयीन मुलगी २० जून रोजी सकाळी १० वाजता संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी कारंजा येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. पण सायंकाळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे चिंतातूर पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण यात ते अयशस्वी झाले. अखेर तिच्या ३५ वर्षीय आईने कारंजा ग्रामीण पोलिसात फिर्याद नोंदवली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२ ) नुसार अपहरणाचा गुन्हा (crime) दाखल करून तपासकामी एक पथक ग’ित केले. संबंधित मुलीकडे मोबाईल होता. पण तिने तो बंद करून ठेवला होता. तिने एकदा अचानक फोन सुरू केला आणि पोलिसांना ती कुठे गेली आहे? हे लगेच कळले. तिच्या शोधासाठी पोलिस पुणे येथे पोहचले आणि तिला २२ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. तेथून मुलीला कारंजात आणण्यात आले असून, तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
यावेळी तिने पोलिसांना आपल्याला बाहेरगावी जाऊन शिक्षण घ्यायचे असून, त्याला पालक विरोध करत होते. त्यामुळे रागाच्या भरात आपण घरातून निघून गेलो, अशी माहिती दिली आहे. दरम्यान, अपहृत मुलीचा पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल रवींद्र नागरे व तुषार भोयर यांनी अल्पावधीत शोध घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.