Gadchiroli :- जिल्ह्यात तंबाखू आणि दारूमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुक्तीपथ’ अभियानामुळे तंबाखु सेवनात २५ टक्के घट झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पूर्ण जिल्ह्यातील दारू सेवनाच्या प्रमाणात ३५ टक्के व तंबाखू सेवनाच्या प्रमाणात २५ टक्के अशी लक्षणीय घट झाली आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे वर्ष २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यात अवैध दारू वरील होणार्या खर्चामध्ये ६२.९ कोटी बचत झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच तंबाखू सेवनावरील खर्चात १०३.१ कोटी रुपये वाचले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यामध्ये एकूण १६६ कोटी रुपयांची बचत झाली झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अवैध दारू वरील होणार्या खर्चामध्ये ६२.९ कोटी बचत झाल्याचे निदर्शनास आले
गडचिरोली पोलिस विभाग (Gadchiroli Police)सुद्धा यासाठी करत असलेल्या दारूबंदी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांची पाठ थोपटली आहे. दर तीन महिन्याला पोलिस अधीक्षक यांचे अध्यक्षतेत १२ ही तालुक्याचे पोलिस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व मुक्तिपथ प्रकल्प संचालक व प्रमुख कार्यकर्ते यांची आढावा बैठक होऊन अवैध दारूवरील कारवाईचे नियोजन केल्या जाते. गुप्त माहितीच्या आधार पोलिस अवैध दारू (Illegal alcohol) नियंत्रणसाठी कारवाई करत आहे. २०२५ या चालू वर्षात १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत अवैध दारू विक्री नियंत्रण करिता एकूण छापे २१०८ टाकून संबधित दारूविक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकूण रु. ६८,६६,२४५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आदिवासी गावात ग्रामसभा, गावसभा होऊन मादक द्रव्य नियंत्रण करिता प्रयत्न सुरू
नक्षलग्रस्त, अविकसित हा कलंक पुसण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात नशामुक्तीसाठी अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करीत असतांना जिल्ह्यातील तरुण हा व्यसनांना बळी न पडता सशक्त आणि निरोगी राहण्यासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासी गावात ग्रामसभा, गावसभा होऊन मादक द्रव्य नियंत्रण करिता प्रयत्न सुरू आहे. २०२४-२५ या वर्षात २५८ ग्रामसभा व १२ इलाकासभेमध्ये मादक द्रव्य नियंत्रण विषयाची मांडणी करण्यात आली.