व्होडाफोन कंपनीचे प्रताप
तुमसर (Water Supply) : व्होडाफोन कंपनीकडून तुमसर नगरपरिषद हद्दीत कोणतीही पूर्व लेखी परवानगी न घेता फायबर केबल टाकण्याचे खोदकाम करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. सदर कारवाई ही महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम, १९६५ च्या विविध तरतुदींना न जुमानता बेकायदेशीरपणे करण्यात आली.
या बेकायदेशीर कामामध्ये व्होडाफोन कंपनीच्या ठेकेदारांकडून मुख्य जलवाहिनीचे छिद्रित करून नुकसान करण्यात आले आहे. यामुळे शहरातील अनेक भागांचा (Water Supply) पाणीपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, नगरपरिषदेला तातडीने दुरुस्तीचे काम करून सार्वजनिक निधी खर्च करावा लागला.
नगरपरिषद कलम २४४ पाणीपुरवठा (Water Supply) व जलसुविधांमध्ये परवानगीशिवाय हस्तक्षेप, कलम २६३ नगरपालिका मालमत्तेचे नुकसान, कलम २६५ सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे काम करणे, कलम ३१२ दंड व खर्चाची वसुली कर आकारणीप्रमाणे करणे. म्हणून ५ लाख रुपयाचा दंड व्होडाफोन आयडिया लिमिटेड यांच्यावर लावण्यात येत आहे.
यासोबतच, व्होडाफोन कंपनीने स्वखर्चाने आणि नगरपरिषदेच्या अभियंता शाखेच्या देखरेखीखाली जलवाहिनीची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी. तसेच दंडाची रक्कम ७ दिवसांच्या आत भरावी. जर वेळेत दंड न भरल्यास, कलम ३१२ नुसार कराच्या थकबाकीप्रमाणे वसुली केली जाईल तसेच पुढील कायदेशीर कारवाई, ठेकेदाराच्या काळ्या यादीत समावेश व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसंबंधी फौजदारी गुन्ह्यांची प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिली आहे.