मानोरा(Washim):- मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पारवा येथे बेकायदा गावठी व देशी दारूची खुलेआम राजरोसपणे विक्री होत आहे. दारु पायी अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत असुन वाद वाढून अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. त्यामुळे गावातील बेकायदा दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी करत राघ राघिणीनी दि. २३ सप्टेंबर रोजी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली व निवेदन सादर केले.
पारवा येथील राघ राघिणी आक्रमक, कारवाई करण्याची एकमुखी मागणी
निवेदनानुसार पारवा येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदा गावठी व देशी दारु विक्री (Alcohol sales) राजरोसपणे खुलेआम सुरू आहे. दारूमुळे अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत आहे. यातून वाद विवाद वाढून चोऱ्यांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. ग्रामस्थांनी बेकायदा दारूविक्री विरोधात एकत्र येत गाव तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सभा आयोजित केली होती. सभेत समितीचे गठणही करण्यात आले होते. समितीने वारंवार बेकायदा दारु विक्री विरोधात आवाज बुलंद केला. ग्राम सभेत दारू बंदीचा एकमताने सर्वानुमते ठराव पारित केला. समिती सदस्याकडून गावातील बेकायदा दारू विरोधात कार्य करण्यात येत आहे. तरी पण दारू विक्री बंदीला लगाम लागत नसल्याने बेकायदा दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलीस विभागानेचकडक कारवाई(action) करण्यासाठी उपाय योजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनावर ममता गव्हाणे, ममता खापरे, जयश्री गवळी, सिंधुताई चिनक, नलिनी चव्हाण, वंदना जाधव, कल्पना शिंदे, पुष्पा शिंदे यांच्यासह अनेक महिला व पुरुष मंडळीच्या स्वाक्षऱ्या आहेत.