डाॅ. रेखा चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
नांदेड (Crops Damage) : गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे (Heavy Rain) हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे नद्याकाठच्या शेती पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crops Damage) झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने 25 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. रेखा चव्हाण-गोर्लेगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे (District Collector) एका निवेदनाद्वारे केली आहे.
इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे हदगाव आणि हिमायतनगरचा संपर्क तुटला!
डॉ. रेखा चव्हाण यांनी नुकसानीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. त्यानंतर त्यांनी प्रशासनाकडून (Administration) तातडीने मदत मिळवण्याची मागणी केली. इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे हदगाव आणि हिमायतनगरचा संपर्क तुटला आहे. कयाधू आणि पैनगंगा या दोन्ही नद्यांच्या संगमावरील 60 ते 70 टक्के जमीन पाण्याखाली गेली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शासनाने (Government) तात्काळ मदत करावी, तसेच ज्या शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे किंवा ज्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणीही डॉ. रेखा चव्हाण यांनी जिल्हाप्रशासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष!
पंचनामे करताना कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वापर करू नये, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. कंत्राटी कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे मागतात आणि पैसे न दिल्यास चुकीचे पंचनामे करतात, त्यामुळे पात्र शेतकरी (Farmer) मदतीपासून वंचित राहतात. याबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश महासचिव डॉ. रेखा पाटील चव्हाण गोर्लेगावकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, मागासवर्गीय सेलचे शहर जिल्हाध्यक्ष सत्यपाल सावंत, मुन्ना अब्बास, राष्ट्रवादी काँग्रेस हिमायतनगरचे तालुका अध्यक्ष सुनिल पतंगे, सविता निमडगे, महेश पाटील, संभाराव कदम, दहिभाते, अक्षय नळगे आदी उपस्थित होते. सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.