पाकिस्तानी हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या विंग कमांडरने युद्ध योजना, ड्रोनची क्षमता आणि लष्करी तैनातीची गोपनीय माहिती केल्याचा आरोप; दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केली चार्जशीट.
नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाची संवेदनशील माहिती मिळवण्याचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारतीय हवाई दलातील एका विंग कमांडरने पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात येऊन देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका न्यूड फोटोच्या आमिषापोटी या अधिकाऱ्याने महत्त्वाची लष्करी माहिती शेअर केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, त्यातून अनेक धक्कादायक तपशील समोर आले आहेत. संबंधित विंग कमांडरला पाच महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, संबंधित अधिकाऱ्याने पाकिस्तानमधील संशयित गुप्तहेराला युद्ध नियोजनाशी संबंधित कागदपत्रे, ड्रोन यंत्रणेची क्षमता, सैन्याच्या तैनातीची ठिकाणे, आघाडीवरील लढाऊ विमानांच्या हालचाली आणि संवेदनशील भौगोलिक समन्वयांकांची माहिती दिली होती. ही माहिती शत्रू देशाच्या हाती लागल्यास भारताच्या लष्करी सामर्थ्याबरोबरच संरक्षण व्यवस्थेतील संभाव्य त्रुटींचाही खुलासा होऊ शकला असता. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती, असे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले आहे.
याशिवाय, एका गोपनीय ड्रोन युनिटची रचना, त्याची कार्यक्षमता, युद्धकाळात करण्यात येणारी तैनाती आणि लढाऊ विमानांशी संबंधित तपशीलही पाकिस्तानला पुरवण्यात आल्याचा आरोप आहे.
न्यूड फोटोच्या आमिषाने गोपनीय माहितीची देवाणघेवाण
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हवाई दलातील हा अधिकारी एका न्यूड फोटोच्या आमिषाला बळी पडल्याचा पोलिसांचा दावा आहे. 12 जानेवारी ते 1 एप्रिल या कालावधीत तो व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एका संशयित पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात होता.
कार्यालयात स्मार्टफोन घेऊन गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला रोखण्यात आले आणि त्याच्या फोनची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी एजंटकडून न्यूड फोटो मिळाल्यानंतर या विंग कमांडरने गोपनीय युद्ध योजनेशी संबंधित एका पानाचे छायाचित्र किंवा दस्तऐवज अपलोड केला होता.
इतकेच नव्हे, तर प्रत्येक न्यूड फोटोच्या बदल्यात युद्ध नियोजनाशी संबंधित आणखी एक नवीन पान पाठवण्याची तयारीही त्याने दर्शवली होती, असा आरोप चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे वैयक्तिक आमिषाचा वापर करून संवेदनशील संरक्षणविषयक माहिती मिळवण्याचे हे प्रकरण असल्याचे तपासातून समोर आले आहे.
मॅलवेअर ॲपच्या माध्यमातूनही माहिती मिळवल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासात पाकिस्तानी एजंटने संबंधित अधिकाऱ्याला काही मॅलवेअर ॲप्लिकेशन्स पाठवल्याचेही उघड झाले आहे. या ॲप्सच्या माध्यमातून अधिकाऱ्याच्या मोबाईलमधील संवेदनशील माहितीपर्यंत पोहोचण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेले संभाषणही पाकिस्तानी एजंटला पाहता आणि ऐकता आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
चार्जशीटमध्ये नमूद केल्यानुसार, या विंग कमांडरने लेहमधील लढाऊ विमानांच्या तैनातीसंदर्भातील तपशील तसेच राजस्थानमधील सूरतगड येथील महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये झालेल्या लष्करी सरावाची माहितीही लीक केली होती. या माहितीचे स्वरूप अत्यंत संवेदनशील असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
व्हॉट्सॲपवर 3,008 मेसेज; 65 फोटो आणि 42 व्हॉइस कॉल
या संपूर्ण प्रकरणात विंग कमांडर आणि पाकिस्तानी गुप्तहेर यांच्यात झालेल्या संवादाचा मोठा तपशीलही चार्जशीटमधून समोर आला आहे. व्हॉट्सॲपच्या पीएमपी डेटा विश्लेषणातून दोघांमधील संवादाची व्याप्ती स्पष्ट झाली आहे.
तपासानुसार, संबंधित अधिकारी आणि पाकिस्तानी एजंट यांच्यात एकूण 3,008 टेक्स्ट मेसेजची देवाणघेवाण झाली. याशिवाय 65 फोटो, 65 रिअॅक्शन्स, 42 व्हॉइस कॉल, 4 व्हिडीओ कॉल आणि 6 URL एकमेकांना पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
या डिजिटल संवादातून केवळ वैयक्तिक संपर्कच नव्हे, तर गोपनीय संरक्षणविषयक माहितीची देवाणघेवाण झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. एका परदेशी गुप्तहेराच्या जाळ्यात अडकून हवाई दलातील अधिकाऱ्याने संवेदनशील माहिती शेअर केल्याचे हे प्रकरण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानले जात आहे.