धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी!
औसा (Dhangar Society) : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी औसा येथे राष्ट्रीय महामार्गावरील चौकात सोमवारी सकाळी (दि. १३) अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण नाही मिळाल्यास संपूर्ण देशातील धनगर बांधव आंदोलन करून दाखवून देतील, असा इशारा यावेळी नेत्यांनी आपल्या भाषणात दिला. धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन (Aandolan) केले जात आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून (ST Category) आरक्षण द्या, अशी मागणी समस्त धनगर समाजाकडून केली जात आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी चक्काजाम, काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पोलिसांनी आंदोलनाच्या वेळी चोख बंदोबस्त ठेवला!
राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटल्यानंतर, आता धनगर समाजाच्या आरक्षणाचाही मुद्दा चांगलाच तापला आहे. आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे.याच मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलन, निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी रास्ता-रोकोदेखील केला जात आहे. दरम्यान,धनगर समाजाच्या या मागणीचा वणवा समस्त राज्यात पेटला आहे.त्यामुळे आता सरकारवर एका प्रकारे दबाव वाढताना दिसतोय. परभणी, जालना, सोलापूर, जळगाव अशा अनेक जिल्ह्यात आंदोलनाचे हे लोण पसरलेले आहे. औसा येथील आंदोलनाने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तब्बल एक तास लागला. पोलिसांनी (Police) आंदोलनाच्या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.