हिंगोली (Collector Rahul Gupta) : दूध व अंडी उत्पादनात हिंगोली जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी आढावा बैठकीत केले.
जिल्ह्यातील दूध उत्पादन व अंडी उत्पादन वाढीसाठी बँकेचे अधिकारी, शेतकरी व उत्पादकांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर. ए. कल्यापूरे, जिल्हा ॲग्रणी बँक अधिकारी सुजित झोडगे, सर्व बँकेचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, दूध उत्पादक शेतकरी, विविध डेअरी फार्मचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यासाठी लागणारी दूध व अंडी जिल्ह्यातच उत्पादन होण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना बँकेमार्फत दुधाळ जनावराचे वितरण करुन जिल्ह्यातील दूध उत्पादनाची क्षमता वाढवावी. दूध उत्पादनात वाढ करणे, उत्पादित होणारे सर्व दूध संकलीत करणे. ज्या गावात दूध संकलन केंद्र नाहीत त्या गावामध्ये दूध संकलन केंद्र सुरु करावेत. दूध संकलन केंद्रामुळे त्या गावात उत्पादित होणाऱ्या दुधास बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी दुग्ध विकास विभाग व बँकेच्या समन्वयातून शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करावे. विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पामध्ये राज्यातील 19 जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे. या दुग्ध विकास प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनाला चालना मिळणार आहे. त्यासाठी दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश (Collector Rahul Gupta) जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील अंडीचे उत्पादन वाढविण्यासाठी कुक्कुटपालन फार्मची क्षमता वाढविण्यासाठी तसेच बंद पडलेले कुक्कुट पालन फार्म सुरु करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन जिल्ह्यातील अंडीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा सूचना (Collector Rahul Gupta) गुप्ता यांनी यावेळी केल्या.
श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास कामाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा
श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात स्वागतद्वार, सुरक्षा भिंत, पोलीस मदत केंद्र, दुकाने, कार्यालय, भक्त निवास, दीपमाळ व अंतर्गत रस्त्याचे कामे करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्यात हरिहर तलावाचे संवर्धन व जीर्णोद्वार, इतर स्मारके, दर्शन बारी, पार्कींग, कचरा व्यवस्थापन, विद्युत रोषणाई, गार्डन, वृक्षारोपण आदी कामे घेण्यात येणार आहेत. यासाठी येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विकास आराखड्यातून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी यावेळी आढावा घेतला.
नगर पालिका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेचा जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा
हिंगोली सर्व नगर पालिका, नगर पंचायतीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजूर निवास, पूर्ण झालेली कामे, प्रगतीपथावरील कामे याच्या सद्यस्थितीचा तसेच शहरातील स्वच्छतेचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी यावेळी आढावा घेऊन सूचना केल्या.