केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांची भूमिका!
लातूर (Gopinathrao Munde) : दिनांक 11 आगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) लातूर दौऱ्यावर येत असून लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण (Statue Unveiling) करण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत. राज्यातील शेतकरी कर्जमाफी व इतर प्रश्नांना घेऊन शेतकरी चिंतेत आहे. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. परंतु एखाद्या दिवंगत लोकनेत्याच्या प्रलंबित पुतळा अनावरण सोहळ्यात अडथळा निर्माण करणे कोणालाही शोभणार नाही. त्यामुळे या सोहळ्यात अखिल भारतीय छावा कोणताही अडथळा आणणार नाही, अशी भूमिका अ.भा. छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी स्पष्ट केली.
महाराष्ट्र राज्याला राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपली पाहिजे ही शिकवण!
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांनी राजकीय क्षेत्रातील हितसंबंध जोपासत आपल्या लातूरसह मराठवाडा महाराष्ट्र राज्याला राजकारणापलीकडे (Politics) जाऊन माणुसकी जपली पाहिजे ही शिकवण दिली आहे. मात्र संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी कसल्याही पूर्व संमती शिवाय जर काही बातमी, अफवा पसरवली तर त्याच्याशी संघटनेचा कसलाही संबंध नाही, असेही जावळे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूर शहरात होणाऱ्या पुतळा अनावरण सोहळ्यात कसलाही अनुचित प्रकार घडला, तर त्यास संबंधित लोक जबाबदार राहतील. अ. भा. छावा संघटना जबाबदार राहणार नाही. त्यामुळे संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी (Activists) लोकनेत्यांच्या सन्मानाला न शोभणारे कोणतेही कृत्य होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन नानासाहेब जावळे पाटील यांनी केले आहे.