१ सप्टेंबरपासून कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय; सर्व्हरवरील ताण आणि तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढ
एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अनिवार्य करण्याची अंमलबजावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी १ सप्टेंबर २०२६ पासून कार्डची सक्ती करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शासनाच्या सवलतीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसह ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट दिले जाते. या सवलतीचा लाभ NCMC कार्डच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, कार्ड काढताना तसेच त्याचा वापर करताना अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी एसटी महामंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या.
NCMC कार्ड प्रणालीच्या सर्व्हरवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याने तिकीट देताना अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी कार्ड रीड न होणे, तांत्रिक बिघाड यांसारख्या समस्यांमुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात एसटीने मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असताना या अडचणी वाढण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ३० सप्टेंबरपर्यंत पूर्वीच्या पद्धतीने सवलतीचे तिकीट देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे NCMC कार्ड अद्याप न घेतलेल्या किंवा कार्डशी संबंधित तांत्रिक अडचणी असलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तूर्तास दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, ज्या प्रवाशांचे NCMC कार्ड आधीच सक्रिय झाले आहे, त्यांनी सवलतीचा लाभ कार्डच्या माध्यमातूनच घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित निर्देश सर्व एसटी आगारांना देण्यात आले आहेत.
मात्र, सक्रिय NCMC कार्ड असूनही ते रीड होत नसेल किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे कार्डद्वारे तिकीट काढणे शक्य होत नसेल, तर अशा परिस्थितीत पूर्वीच्या पद्धतीने सवलतीचे तिकीट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे NCMC प्रणाली पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात काही प्रमाणात सवलत मिळणार आहे.