रात्रीऐवजी आता दिवसाही धावू लागली वाळूची वाहने, पर्यावरण प्रेमीत संतापाची लाट!
परभणी (Sand Smuggling) : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील गावातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने काही काळासाठी विशेष मोहीम राबवली होती. मात्र सद्यस्थितीत ही मोहीम थंडावल्याचे स्पष्टपणे जाणवत असून पूर्वी रात्री चालणारा वाळू उपसा (Pump The Sand) व वाहतूक आता दिवसाढवळ्या सुरू असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने (Administration) याकडे कानाडोळा तर केला नाही ना? असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून (Local Citizens) उपस्थित केल्या जात आहे.
गोदावरी नदी पात्रातून ट्रॅक्टर आणि सेक्षण पंपाच्या सहाय्याने राजरोसपणे सर्रास वाळू उपसा सुरू!
गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाळी परिस्थितीमुळे तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या मसला, पिंप्री, झोला, सावंगी भुजबळ, नागठाणा, मैराळसावंगी, धारासूर, चिंचटाकळी, भांबरवाडी आदी गावांमध्ये अवैध वाळू उपसा काही प्रमाणात थांबला असला तरी गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रावराजूर व खुर्लेवाडी भागात मात्र गोदावरी नदी पात्रातून ट्रॅक्टर आणि सेक्षण पंपाच्या सहाय्याने राजरोसपणे सर्रास वाळू उपसा सुरू असल्याचे स्पष्ट चित्र पहावयास मिळत आहे. गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या उपसा केलेल्या वाळूने भरलेली वाहने सुसाट वेगाने मुख्य रस्त्यांवरून धावत असल्यामुळे या वाहनाद्वारे होणारे पर्यावरणीय नुकसान (Environmental Damage) आणि सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या विशेष पथकासह स्थानिक महसूल व पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास असमर्थ ठरल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे असुन वाळू उपस्याचे तराफे जळून नष्ट करणे, विनापरवाना वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर व वाळू वाहतूकीची वाहने पकडणे अशी कारवाई करून ही पुर्वी रात्रीच्या वेळी होत असलेली वाळू वाहतूक आता दिवसाढवळ्या सुरु झाल्याने ‘ही मोहीम फक्त काही दिवसांचा फुगा तर नव्हती ना? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला!
गोदावरी नदी पात्रातील वाळू (Godavari River Sand) धक्क्याच्या लिलावातुन शासनाला दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळत होता. मात्र गेल्या तीन वर्षांपासून वाळू धक्यांचा लिलाव झालेला नसतांना ही अवैध वाळू उपस्याच्या माध्यमातून सुरु असलेल्या वाळू चोरीमुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे. यास महसूल व पोलीस प्रशासनातील (Police Administration) काही शुक्राचाऱ्यांची साथ वाळू माफियांना (Sand Mafia) मिळत असल्याचे ही परिसरातील नागरिकांतून बोलल्या जात आहे.
पर्यावरणाचा धोका वाढतोय!
गोदावरी नदी पात्रातील वाळू उपसा नैसर्गिक प्रवाह (Natural Flow) आणि भूमिगत पाण्याच्या पातळीवर गंभीर परिणाम करत असुन अशा पद्धतीने सुरू असलेली वाळू चोरी (Theft of Sand) पर्यावरणाच्या दृष्टीनेही अतिशय घातक असल्याने प्रशासनाने यावर तात्काळ ठोस पावले उचलून कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे मत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व्यक्त केले आहे.