हरदोली/सिहोरा (Sihora Gram Panchayat) : सिहोरा परिसरात ग्रामपंचायतींच्या कारभाराचा डोलारा प्रभारी ग्रामसेवकांच्या खांद्यावर असल्याने गावांचा विकास थांबला आहे. एकाच ग्रामसेवकाकडे अनेक गावांचा अतिरिक्त प्रभार असल्यामुळे प्रशासकीय कामांवर परिणाम होत असून, गावकर्यांची गैरसोय वाढत आहे. अनेक ठिकाणी ग्रामसेवक लांबच्या गावांचा प्रभार सांभाळत असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर काही (Sihora Gram Panchayat) ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांना विलंब होत असल्याचा आरोप गावकर्यांकडून केला जात आहे.
रिक्त पदांमुळे वाढलेला ताण
सिहोरा परिसरातील (Sihora Gram Panchayat) पंचायत विभागात ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी, एका ग्रामसेवकाकडे दोन ते तीन गावांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. ही गावे एकमेकांपासून दूर असल्यामुळे ग्रामसेवकांना एका गावातून दुसर्या गावात जाण्यासाठी वेळ लागतो आणि त्यांच्या कामावर मोठा ताण येत आहे. त्यामुळे एकाच गावात पूर्णवेळ लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. अनेक ग्रामसेवक इतर गावांमध्ये उपस्थित असल्याचे कारण देऊन मूळ गावातील कामकाजाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. यामुळे गावातील मूलभूत विकासकामांवर थेट परिणाम होत आहे.
विकास योजनांची अडचण
ग्रामपंचायतींच्या (Sihora Gram Panchayat) विकासकामांचा केंद्रबिंदू असणारे ग्रामसेवकच कामाच्या प्रचंड ताणाखाली असल्याने विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीला मोठा फटका बसत आहे. सरपंच आणि इतर पदाधिकारी विकासकामांसाठी ग्रामसेवकांवर अवलंबून असतात, पण ग्रामसेवकांकडे वेळ नसल्यामुळे अनेक ठराव आणि प्रस्ताव जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे पाठवले जात नाहीत. जरी पाठवले तरी त्यांच्या पाठपुराव्यासाठी पुन्हा पुन्हा कार्यालयाच्या वार्या कराव्या लागतात. यामुळे अनेक योजना केवळ कागदावरच राहून जात आहेत.
ग्रामपंचायतींच्या (Sihora Gram Panchayat) पदाधिकार्यांसाठी शासनाकडून प्रशिक्षणांवर मोठा खर्च केला जातो, मात्र हे प्रशिक्षण घेतल्यानंतरही त्यांना योजनांची योग्य माहिती नसल्याचे दिसून येते. त्यामुळे गावाच्या विकासासाठी आवश्यक असणार्या अनेक योजनांची माहिती असूनही त्या प्रत्यक्षात आणता येत नाहीत. याचाच परिणाम म्हणून, सिहोरा परिसरात अद्याप एकाही गावाला ‘स्मार्ट गावाचा’ पुरस्कार मिळालेला नाही, किंवा एकाही गावाने या दिशेने उल्लेखनीय प्रगती केलेली नाही.
गावकर्यांमध्ये नाराजीचा सूर
गटग्रामपंचायतीच्या (Sihora Gram Panchayat) निवडणुका जवळ आल्या आहेत. येत्या दोन महिन्यांत निवडणुका होतील आणि गावकरी आपल्या गावात झालेल्या कामांचा हिशोब मागतील. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, अनेक गावांमध्ये विकासाची घडी विस्कटलेली आहे. ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांना अनेक लहान-मोठ्या कामांसाठी ताटकळत राहावे लागत आहे.
यामुळे गावकर्यांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करून रिक्त पदे भरण्याची मागणी जोर धरत आहे, जेणेकरून गावांचा थांबलेला विकास पुन्हा मार्गी लागेल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल. यावर जिल्हा प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.